भुसावळात तरुणावर चाकूहल्ला

उधारीच्या पैशातून उफाळला वाद : चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा

भुसावळ : उधारीच्या पैशातून तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना शहरात मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवीगाळ करीत तरुणावर चाकूहल्ला
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हर्षल जितेंद्र कदम (रा.गजानन महाराज मंदीराजवळ, भुसावळ) याने उसनवारीचे दोन हजार परत न केल्याने त्यास चौघांनी मारहाण केली. हर्षल कदम याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी रोहित भंगाळे याच्याकडून दोन हजार घेतले मात्र ते परत न केल्याने मंगळवारी रात्री नऊ वाजता वांजोळा रोडवरील रेणूका देवीच्या मंदिराजवळ हर्षलवर रोहित भंगाळे, गोपाळ भंगाळे, तेजस बोरोले व गोविंद बोरोेले (सर्व रा. श्रीराम नगर, भुसावळ) यांनी मारहाण केली. रेणूका देवीच्या मंदीराच्या बाजूला रोहितने शिवीगाळ करून हर्षलच्या डोक्यावर बिअरची बाटली मारली तर संशयीत गोपाळ भंगाळे याने हर्षलच्या पोटात डाव्या बाजूला व डाव्या पायाच्या मांडीवर पाठीमागील बाजूस चाकूने वार केले. अन्य संशयीतांनी हर्षल याला शिवीगाळ, मारहाण केली. या मारहाणीत हर्षल जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात चारही संशयीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.

Copy