Private Advt

भुसावळात ट्रामा केअर सेंटरमध्ये अखेर शवविच्छेदनाला सुरूवात

भुसावळ : अंतर्गत कुरघोड्यांमुळे भुसावळ पालिका रुग्णालयात शवविच्छेदन कक्षाला टाळे लागल्याने शवविच्छेदन करण्यासाठी अत्यंत गैरसोय होत होती. या संदर्भात माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी वैयक्तिक लक्ष घालून जिल्हा शल्य चिकित्सकांशी संवाद साधल्यानंतर भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये सोमवार, 11 एप्रिलपासून शवविच्छेदनाला सुरूवात झाली आहे. ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमधील एका रुममध्ये तात्पुरत्या स्वरुपात पीएम रुम रविवारपासून सुरू करण्यात आली.

भुसावळकरांचा त्रास झाला कमी
पालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष असलातरी पालिकेकडे शवविच्छेदनासाठी डॉक्टर नसल्याने गेल्या 13 वर्षांपासून ही सुविधा बंद होती. डिसेंबर 2020 मध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी यांनी पालिकेच्या रुग्णालयातील शवविच्छेदन कक्ष स्वत: पुढाकार घेवून नागरीकांच्या सुविधेसाठी मागितल्याने तो उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र 6 मार्च रोजी पालिकेने कुरघोड्या करीत शवविच्छेदन कक्षाला कुलूप ठोकले होते. यानंतर ही सेवा बंद झाली होती.

अखेर ट्रामा केअर सेंटरमध्ये कक्ष कार्यान्वीत
ग्रामीण रुग्णालयात एका रुममध्ये पक्के शवविच्छेदन गृह तयार होत नाही, तोपर्यंत एका दुसर्‍या कक्षात तातुरता शवविच्छेदनाला सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी भुसावळात झालेल्या अपघातातील मयतासह मुस्लीम कॉलनीत मयत झालेल्या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदनकरण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, पालिका रुग्णालयातील पीएम रुममध्ये हेल्पर सुरेश हंसकर यांची पालिकेने कंत्राटी स्वरुपात नियुक्ती केल्याने त्यांची करार काळातील नियुक्ती ट्रामा केअर सेंटरमध्ये केल्यास पीएम करताना मदत होणार आहे.