Private Advt

भुसावळात ट्रक धडकल्या : दोघे चालक ठार

भुसावळातील रेल्वे उड्डाणपुलावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात अपघात : क्लीनर गंभीर जखमी : मध्यरात्रीची घटना

भुसावळ : भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या नादात समोरून येणार्‍या डंपरला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील चालकांचा मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळील राजस्थान मार्बलजवळ मंगळवार, 21 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर बाजारपेठ पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली. अपघात प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री अपघातानंतर पोलिसांची धाव
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक (जी.जे.02 झेड.झेड.2922) व खडी वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.19 सी.वाय.5327) यांच्यात जोरदार धडक होवून दोन्ही वाहनातील चालकांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ कर्मचार्‍यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्रीच क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. या अपघातात डंपर चालक ज्ञानप्रताप मेवालाल पटेल (58, टिकुरी समदन, मेजा रोड, प्रयागराज, उत्तरप्रदेश) व ट्रक चालक अयुब हुसेन सिद्दीकी (नंदासन, मेहसाना, गुजरात) यांचा मृत्यू झाला तर सह चालक तौसीफ रसुलभाई कुरेशी (32, नंदासन, मेहसाना, गुजरात) जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओव्हरटेकच्या नादात घडला अपघात
भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने निघालेला रीकामा ट्रक (जी.जे.02 झेड.झेड.2922) सुसाट वेगाने निघाला असतानाच गोंभी येथून आयुष प्रोकांत कंपनीसाठी खडी घेवून निघालेला डंपर (एम.एच.19 सी.वाय.5327) समोर येताच ओव्हरटेकच्या नादात ट्रक डंपरवर आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की, डिव्हायडरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर दोन्ही वाहनाच्या दर्शनी बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दोन्ही वाहनातील चालकांसह सह चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले असता दोन्ही चालकांचा काही अंतराने मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. अपघातप्रकरणी आयुष प्रोकांत प्रा.लि.कंपनीचे मेन्टनन्स विभागातील गंगाप्रसाद राजाराम निषद (42, समदान अतशेला, ता.मेजा, प्रयागराज, इलाहाबाद) यांच्या फिर्यादीनुसार चालक तौसीफ रसुल कुरेशी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.