भुसावळात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

0

भुसावळ : भुसावळात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येनंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी रविवारी शहराला भेट देत पाहणी केली तसेच प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेवून एकूण परीस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकार्‍यांनी कोविड सेंटर म्हणून घोषित केलेल्या रेल्वे रुग्णालयाला भेट दिली तसेच डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याशीही चर्चा केली.

क्रिटीकल रुग्णांना जळगावी हलवण्याचे आदेश
प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी ट्रामा केअर सेंटरला मॅटर्निटी सेंटर म्हणून वापरण्यास सुरुवात करण्याच्या सूचना केल्या शिवाय कंन्टेमेंट झोनचा परीसर एक किलोमीटर असल्याने नागरीकांची होणारी गैरसोय व ओरड पाहता हा परीसर कमी करण्याच्या सूचना केल्या. ट्रीपलसी सेंटरला ग्रामीण आरोग्य केंद्राच्या दहा डॉक्टरांची नियुक्ती का केली नाही? याबाबत प्रांताधिकार्‍यांना विचारणा करीत नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी शहरातील रुग्ण आढळून येत असलेल्या भागात सर्वे करण्याचे आदेशही देण्यात आले. यापुढे क्रिटीकल रुग्ण असल्यास जळगावात पाठवावे अन्यथा स्थानिक स्तरावर सुरू करण्यात आलेल्या रेल्वे रुग्णालयात (कोविड केअर सेंटर) मध्ये त्यांना हलवण्याच्या सूचना करण्यात आल्या. भुसावळसह बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, सावदा आदी भागातील सेकंड स्टेजजचे रुग्ण येथे हलवण्यात येणार आहेत. तसेच नगरपालिकेला खर्चाची अडचण समोर आल्याने 14 व्या वित्त आयोगातून खर्चाचे आदेश त्यांनी दिले तसेच रेल्वे रुग्णालयात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने डॉक्टर व औषधी सेवा पुरवठा कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी सी.एस.यांना केल्या.

भुसावळकरांना घरातच थांबण्याचे आवाहन
भुसावळकर पाळत असलेल्या चार दिवसीय बंदचे जिल्हाधिकार्‍यांनी अभिनंदन करीत रुग्ण संख्या न वाढण्यासाठी शहरवासीयांनी घरातच थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. याप्रसंगी रेल्वे हॉस्पीटलला त्यांनी भेट दिली तसेच डीआरएम कार्यालयात डीआरएम यांच्याशी चर्चा केली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला प्रांताधिकारी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, मुख्याधिकारी करुणा डहाळे, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, डॉ.किर्ती फलटणकर आदींची उपस्थिती होती.