भुसावळात चोरट्यांनी लांबवला महागडा टीव्ही

  • भुसावळ : शहरातील प्रभाकर कॉलनीत वास्तव्यास असलेल्या ग्रामसेवकाच्या घरातून चोरट्यांनी महागडा टीव्ही लांबवल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध
ग्रामसेवक सुबोध सोये (प्रभाकर कॉलनी, भुसावळ) हे कुटुंबासह राहतात. रविवारी रात्री ते पत्नीसह खालच्या मजल्यावर झोपले होते तर मुलगा वरच्या मजल्यावर अभ्यास करीत होता. रात्री 12 वाजेनंतर तोदेखील खाली झोपल्यासाठी आला मात्र बाल्कनीचे दार लावण्यास विसरल्याने चोरट्यांना संधी मिळाली. चोरट्यांनी 54 हजार रुपये किंमतीचा महागडा टीव्ही लांबवला. वर्षभरापूर्वीच हा टीव्ही घेण्यात आला होता व त्याचे खोकेदेखील त्याच रूममध्ये असल्याने चोरट्यांनी खोक्यात टाकून टीव्ही लांबवला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक निरीक्षक संदीप डूणगहू व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी रूममधील लॅपटॉपसह अन्य साहित्याला हात न लावता केवळ टीव्ही लांबवल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास एएसआय सुरेश महाजन करीत आहेत. दरम्यान, शहरातील महिला महाविद्यालयाजवळील संगणक क्लास व लेडीज टेलर्स व एका डेअरीत देखील चोरट्यांनी टॉमी वाकवून चोरीचा प्रयत्न केला मात्र काहीही ऐवज गेला नसल्याचे सांगण्यात आले.