Private Advt

भुसावळात ग.स.सोसायटीसाठी 68 टक्के मतदान : दुपारनंतर मतदारांच्या लागल्या रांगा

भुसावळ : अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग.स.सोसायटीसाठी भुसावळ शहरातील म्युन्सीपल हायस्कूलमध्ये गुरुवारी 68 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. तत्पूर्वी, चार वाजता मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद करून आवारात असलेल्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला. एकूण 67.96 टक्के मतदान झाले.

67.96 टक्के मतदान
म्युनिसीपल हायस्कूल मतदान केंद्रात एकूण 1,639 मतदार होते. त्यापैकी 1,114 मतदारांनी हक्क बजावला. ही टक्केवारी 67.96 आहे. दरम्यान, सकाळी केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. दुपारी 3 वाजेनंतर मात्र मतदारांच्या रांगा लागल्या. मतदानाची अखेरची वेळ दुपारी 4 वाजेपर्यंत होती. मात्र, मतदारांची केंद्राबाहेर रांग असल्याने मुख्य प्रवेशद्वार बंद करून सायंकाळी 6 पर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चार वाजेनंतर आलेल्या कोणालाही पोलिसांनी आत घेतले नाही. बाजारपेठचे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेजस पारिस्कर, वसीम मलीक व वैशाली सोनवणे यांनी बंदोबस्त ठेवला. आता निकालाची उत्सुकता आहे.

बोदवडची मतदानात आघाडी
भुसावळ विभागातील पाच तालुक्यांत सर्वाधिक मतदान बोदवड तालुक्यात 87 टक्के, तर सर्वाधिक कमी मतदान भुसावळात 67.96 टक्के झाले. यावलमध्ये 75.40, रावेर 84.28, मुक्ताईनगर 78.93 असे मतदान झाले. आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी समर्थक सकाळपासून मेहनत घेताना दिसले.