भुसावळात गार्ड लाईनजवळ हॉटेल व्यावसायीकाला लुटले

भुसावळ : शहर रेल्वे लार्ड लाईनजवळून जाणार्‍या हॉटेल व्यावसायीकाला अज्ञातांना मारहाण करीत लुटल्याची घटना रविवार, 7 ऑगस्ट रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेल व्यावसायीकास लुटले
तक्रारदार दिनेश भीमराव जाधव (30, सात नंबर पोलीस चौकी, भुसावळ) हे रविवारी रात्री 12.30 वाजेनंतर गार्डलाईन जवळील चर्चमागून जात असताना अज्ञात आरोपीने जाधव यांचा रस्ता अडवत त्यांना मारहाण केली तसेच 14 हजारांची रोकड लांबवली. या प्रकारानंतर जाधव यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत सोमवारी तक्रार नोंदवली. घटनेच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान, यापूर्वी देखील या भागात रस्ता लुटीच्या घटना घडल्या आहेत तर हाकेच्या अंतरावर रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणे आहे मात्र असे असतानाही लुटीच्या घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या भागात पोलिसांनी गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गतवर्षीदेखील झाली लुटीची घटना
भुसावळातील रेल्वे गार्ड लाईन रोडवर 20 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सहा.लोकोपायलट चंदन अनिरुद्ध प्रसाद (28, रा.संभाजी नगर, भुसावळ) हे ड्युटीवरून घरी जात असताना मारहाण करीत दोन मोबाईल, सोन्याची चैन, बॅग लांबवण्यात आली होती. त्यावेळी बाजारपेठ पोलिसांनी चौघांच्या मुसक्या बांधल्या होत्या.