भुसावळात कुविख्यात बाबा काल्याची पोलिसांनी काढली ‘वरात’

0

शांत, संयमी पोलिस उपअधीक्षकांमध्ये भुसावळकरांना दिसले ‘राऊडी राठोड’

भुसावळ (गणेश वाघ) : किराणा व्यावसायीकाला पिस्टल दाखवून लुटल्याच्या घटनेने भुसावळातील गुंडगिरी पुन्हा ऐरणीवर आली अन् नेहमीप्रमाणे ‘पोलिस प्रशासन’ माध्यमांच्या निशाण्यावर आले मात्र गुन्हेगाराला त्याच्याच भाषेत समजावून नव्हे ‘ठोकून’, त्याची ‘वरात’ काढून पोलिसांनी ‘कानून के हात लंबे आहेत’चा प्रत्यय दिला तसेच भुसावळकरांना ते सुरक्षित असल्याचे आश्‍वस्तदेखील केले. एरवी शांत, संयमी व अभ्यासू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी बुधवारी कुविख्यात गुन्हेगार बाबा काल्याची थेट वरात काढून आपणही ‘राऊडी राठोड’ पेक्षा कमी नसल्याचा प्रत्ययही दिला. पोलिसांचे आक्रमक रूप पाहून खरे तर भुसावळकर सुखावले असून आगामी काळातदेखील गुन्हेगारी अशाच पद्धत्तीने ठोकून काढण्याची माफक अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त झाली.

गुन्हेगाराला घडवली अद्दल
भुसावळ व गुन्हेगारीचे अतुट समीकरण गेल्या वर्षांमध्ये तयार झाले आहे. दिवसा-ढवळ्या होणारे खून, लूट, अत्याचार, चोर्‍या, घरफोड्या भुसावळकरांसाठी आता नवीन नाही. गुन्हेगारांना लाभलेला राजाश्रय व पोलिस प्रशासनावर असलेला छुप्या दबावामुळे खरे तर गुन्हेगारी शहरात वारेमाप वाढली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही मात्र वाढलेल्या गुन्हेगारीला थोपण्यासाठी अलिकडच्या काळात पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले खरे मात्र गुन्हेगारीचा आलेख हा चढताच राहिला. त्यातच दोन दिवसांपूर्वी किराणा व्यावसायीकाला पिस्टल दाखवून धमकावणार्‍या कुविख्यात बाबा काल्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात पोलिसांना यशदेखील आले मात्र गुन्हेगारीचा माज उतरवण्यासाठी बुधवारी सायंकाळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी धारण केलेला आक्रमक पवित्रा भुसावळकरांसाठी सुखावह ठरला व नेहमीसाठीच पोलिसांनी गुन्हेगारी शहरातून हद्दपार करावी, अशी आशादेखील व्यक्त करण्यात आली.

गुन्हेगाराच्या वरातीने भुसावळात खळबळ
कुविख्यात गुन्हेगार बाबा काल्या व शेख रेहान यांना बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांनी वाहनातून शनी मंदिर वॉर्डात नेले व तेथून दोघांची पायी वरात काढत रजा टॉवरपर्यंत नेत असताना पोलिस उपअधीक्षकांनी चांगल्याच ‘खाक्या’ आरोपींना दाखवल्या. पोलिस सूत्रांनुसार, आरोपींना घटनास्थळावर स्पॉट व्हेरीफिकेशनसाठी नेण्यात आले मात्र ऑफ द रेकॉर्ड खरे तर गुन्हेगारांचा माज उतरवण्यासाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले हेदेखील तितकेच खरे! ज्या भागात बाबा काल्याची दादागिरी आहे, त्या भागात त्याला पोलिसांनी फिरविल्यानंतर नागरीकांनी त्यास पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह बाजारपेठ पोलिसांचे डीबी पथकातील पोलिस कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते.

Copy