भुसावळात कारागृहातून कैदी पसार होण्यापूर्वीच जाळ्यात

0

भुसावळ : भुसावळातील कारागृहातून पोलिसांच्या हातावर तूरी देवून पसार होण्याच्या बेतात असलेल्या आरोपीच्या जेल पोलिसांनी नागरीकांच्या सतर्कतेने मुसक्या आवळल्या. मंगळवारी ही घटना घडली. आकाश श्रीओम बारसे (चांदमारी चाळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने कारागृहातून पलायनाचा प्रयत्न केल्याने त्याच्याविरुद्ध हवालदार भानुदास निवृत्ती पोटे (58, तुरूंग रक्षक, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीच्या पसार होण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या
मंगळवार, 14 रोजी सकाळी 10 वाजता कैद्यांना कारागृहातून बाहेर जेवणासाठी बाहेर काढल्यानंतर आकाश बारसे हा कैदी कौलारू खोल्यावरून जाळीकडे पळाला व जुन्या तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना गार्डनमध्ये आरोपीने उडी मारली व त्याचवेळी अधीक्षक भानवसे, कर्मचारी सुरेश बडगुजर, शेख जाबीर, अनिल बडगुजर आदींनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतर आरोपीला डी.एस.ग्राऊंड भागातून अटक करण्यात आली. दरम्यान, भुसावळच्या कारागृहातून आरोपीने पलायन करण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.