भुसावळात कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या 95 गुरांची सुटका

0

पाच जणांविरुद्ध गुन्हा, एकास अटक ; एक गोर्‍हा दगावला, जनावरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी

भुसावळ- कत्तलीच्या उद्देशाने शहरातील मिल्लत नगरात गुरे आणल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांनी मिळाल्याने शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका बंगल्यावर छापा टाकण्यात आला तर 95 जनावरे बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. या गुरांची पोलिसांनी सुटका करीत त्यांना जळगावच्या गो शाळेत हलवले तर एका गोर्‍ह्याचा मृत्यू झाला. या जनावरांमध्ये 12 गायींसह, गोर्‍हे व बैलांचा समावेश आहे. गोवंशी वाहतुकीला बंदी असताना जनावरे कत्तलीच्या उद्देशाने आणल्याप्रकरणी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका आरोपीस अटक करण्यात आली असून अन्य चौघे सार झाले आहेत.

गोपनीय माहितीवरून पोलिसांनी टाकला दापा
शहरातील मिल्लत नगर भागातील मो. सईद अ. सत्तार कुरेशी याच्या बंगल्याच्या आवारात कत्तलीसाठी विनापरवानगीने काही गुरे आणल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार, उपनिरीक्षक मनोज पवार यांच्यासह बाजारपेठ पोलिसांच्या 28 कर्मचार्‍यांनी कुरेशी यांच्या बंगल्यावर छापा टाकला. पोलिसांनी प्रवेश केल्यानंतर मुख्य दरवाजा बंद करून तपासणी केली. त्यात बंगल्यात 95 गुरे कत्तलीसाठी छोट्या दोरखंडाने बांधून ठेवल्याचे दिसले. त्यात 12 गायींचा समावेश होता शिवाय ही सर्व गुरे वाहनात कोंबून आणल्याने त्यांच्या अंगावर जखमा आढळून आल्या. काही वासरांचे पाय देखील तुटले होते. दरम्यान, पोलिसांनी पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना पाचारण करीत गुरांची आरोग्य तपासणी करीत पोलिसांनी गो रक्षकांच्या मदतीने गुरांना ट्रकमध्ये चढवून जळगावातील पांझरपोळ संस्थेमध्ये रवाना केले तर एका गोर्‍ह्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाच जणांविरुद्ध गुन्हा ; एकास अटक
या प्रकरणी माणिक सपकाळे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात मो.सईद अब्दुल सत्तार (55), मोहित शेख अजीज, जहीर खान बाबूलाल खान, शेख आसीफ शेख युसूफ (मिल्लत नगर, भुसावळ), जब्बार हसन कुरेशी (सर्व रा.नसरवांजी फाईल, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंश वाहतुकीला बंदी असताना व शेतीकामासाठी जनावरे उपयुक्त असताना ती कत्तलीसाठी आणण्यात आली तसेच त्यांना निदर्यतने बांधण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.