Private Advt

भुसावळात एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

वांजोळा रोडवरील प्रेरणा नगराजवळील गोकुळ रेसीडेन्सीतील घटना : ठोस कारण अद्याप अस्पष्ट

भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील रीक्षा चालकाच्या कुटुंबातील चारही सदस्यांनी विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार, 10 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बाजारपेठ पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी धाव घेत अत्यवस्थ सदस्यांना तातडीने उपचारार्थ हलवले. दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांनी मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न केल्यास ठोस कारण अद्याप कळू शकले नसलेतरी आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलण्यात आले असावे? अशी चर्चा आहे.

एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न
शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगरामागे गोकुळधाम रेसीडेन्सीत रीक्षा चालक विलास भोळे हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील चारही सदस्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार रात्री उशिरा गल्लीतील नागरीकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ तसेच कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने चारही सदस्यांना उपचारार्थ हलवले. विलास प्रदीप भोळे (60), लताबाई विलास भोळे (52), प्रेरणा विलास भोळे (28), चेतन विलास भोळे (27, सर्व रा.वांजोळा रोड, प्रेरणा नगर) यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. भोळे कुटुंबाने नेमका आत्महत्येचा प्रकार का केला? याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही.