भुसावळात इलेक्ट्रॉनिक दुकान पेटले : 30 लाखांचे नुकसान

0

इलेक्ट्रीक तार दुकानावर पडल्याने लागली आग

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीजवळील नवदीप इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड रेफ्रिजरेशन या दुकानाच्या छतावर इलेक्ट्रीक पोलवरील वीज वाहक तार तुटून पडल्याने भीषण आग लागली. या आगीत दुकानातील महागडे पाच झेरॉक्स मशीन, फ्रीज, 60 कुलर बनवण्यासाठी लागणारे साहित्य, जुन्या व नव्या ईलेक्ट्रॉनिक्स मोटर्स तसेच अन्य इलेक्ट्रीक साहित्य जळाल्याने सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले.

इलेक्ट्रीक तार तुटल्याने लागली आग
सूत्रांच्या माहितीनुसार, नाहाटा महाविद्यालयाजवळ गजेंद्र बाळू जंगले यांच्या मालकिचे नवदीप इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड रेफ्रिजरेशन नावाचे दुकान असून गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास दुकानाच्या छतावर वीज वाहक तार तुटून पडल्याने आग लागली. दुकानात 60 कुलर्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य असल्याने व त्यातच लाकर्डी फर्निचर व कुलरमध्ये वापरलेल्या जाणार्‍या कोरड्या गवताने लागलीच भडका घेतल्याने पाहता-पाहता दुकान जळून खाक झाले. पालिकेच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. बाजारपेठ पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. दुकानातील साहित्याचे बिल आल्यानंतर नेमका नुकसानीचा आकडा कळेल, असे जंगले यांनी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे. नगरसेवक पिंटू ठाकूर, बापू महाजन, गणेश डोळे यांनी धाव घेतली.