Private Advt

भुसावळात आयशर घरावर धडकला : आरोपी चालकाची जामिनावर सुटका

भुसावळ : शहरातील यावल नाक्यासमोरील डॉ.आंबेडकर नगरात नियंत्रण सुटलेला आयशर ट्रक घरावर धडकून सम्राट दादाराव इंगळे (21) या तरुणाचा मृत्यू झाला तर घर पडल्याची घटना शनिवार, 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता घडली होती. या अपघातात मयत तरुणाचा भाऊ निलेश इंगळे हा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी आयशर चालक कलीम सलीम कुरेशी (सावदा) याला शहर पोलिसांनी अटक केली होती. आरोपी चालकाला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

आरोपी चालकाची जामिनावर सुटका
यावल नाक्यासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी दादाराव इंगळे यांच्या घराची भिंत तोडून आयशर वाहन घरावर धडकले होते. यावेळी सम्राट (21) हा तरुण अंघोळीला बसला असतानाच त्याला वाहनाची जबर धडक बसली होती. या अपघातात सम्राटचा मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी वाहन चालक कलीम कुरेशी यांना कुणीही मारहाण केली नाही, असे त्या परीसरातील नागरीकांनी सांगितले तर शहर पोलिसांनी चालक कुरेशी याला अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने कुरेशी यांना जामीन मंजूर केला. तपास सहा.फौजदार संजय कंखरे करीत आहेत.