Private Advt

भुसावळात आठ हजारांचा विमल गुटखा जप्त

भुसावळ : शहरातील रजा टॉवर भागातील सुभाष पोलिस चौकीजवळील नॅशनल किराणा दुकानातून बाजारपेठ पोलिसांनी आठ हजार 30 रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त केला. बाजारपेठ पोलिसांना संबंधित दुकानात गुटखा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवार, 31 रोजी सायंकाळी सहा वाजता कारवाई केली. यावेळी दुकानातून प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सचिन रमेश पोळ (भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार दुकानदार प्रवीण अशोक अग्रवाल (शिवाजी नगर, भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश घायतड, चालक सोनवणे, नाईक निलेश चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.