Private Advt

भुसावळात आगीत होरपळून वृद्धाचा मृत्यू

भुसावळ : शहरातील न्यू सातारा भागातील ओंकारेश्वर मंदिराजवळ पेटत्या मेणबत्तीमुळे घराला आग लागून 70 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 24 रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एकनाथ रघुनाथ कांबळे (70, न्यू सातारा, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

मेणबत्तीमुळे आग लागल्याचा संशय
कांबळे हे गेल्या काही वर्षांपासून एकटेच वास्तव्यास होते शिवाय त्यांच्या घरात वीजपुरवठा नव्हता मात्र मेणबत्तीच्या उजेडात राहत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी पहाटेच्या सुमारास मेणबत्ती पडल्याने घराला आग लागली त्यात एकनाथ कांबळे यांचा होरपळून मृत्यू झाल्याचा संशय आहे. पहाटेच्या सुमारास आग लागल्याचे कळताच अनिल दामोदर कांबळे यांनी अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर बंबाने आग आटोक्यात आणली तर स्थानिक रहिवाशांनीदेखील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. शहर पोलिसात अनिल कांबळे यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, सहाय्यक निरीक्षक संदीप दुणगहू यांच्यासह शहरच्या पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपास शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत.