भुसावळात आगीत तीन दुकाने खाक

भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल गॅलेक्सीजवळ विद्युत तार तुटल्याने शॉर्ट सर्किट होवून लागलेल्या आगीत तीन दुकाने खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी पहाटे 5.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आगीनंतर पालिकेच्या तीन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. सूत्रांच्या माहितीनुसार, हॉटेल गॅलेक्सीनजीक शेख अजगर उर्फ अज्जू यांचे महाराष्ट्र ऑटो गॅरेज तसेच सलमान मुस्ताक कुरेशी यांचे बांधकाम साहित्याचे गोदाम तसेच अन्य एकाचे गोदाम आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास इलेक्ट्रीक तार तुटल्याने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आगीमुळे गॅरेजमधील साहित्यासह बांधकाम साहित्याच्या गोदामातील सेंट्रीग साहित्य, बल्ली, तार तसेच नजीकच्या गोदामातील पुठ्ठे व रद्दी खाक झाली. या घटनेनंतर नागरीकांची मोठी घटनास्थळी गर्दी झाली होती. या घटनेत सुदैवाने प्राणहानी टळली असलीतरी लाखोंचे साहित्य मात्र खाक झाले आहे.