Private Advt

भुसावळात अप्रिय घटनांना आळा बसण्यासाठी रीक्षांमध्ये लावले पोलीस क्रमांकाचे स्टीकर्स

जिल्हा पोलीस अधीक्षकांची संकल्पना : कागदपत्रे नसलेल्या रीक्षांवर पुढील आठवड्यापासून धडक कारवाई होणार

भुसावळ : अप्रिय घटनांना आळा बसण्यासाठी शहरातील प्रवासी रीक्षांमध्ये शहर, बाजारपेठ व नियंत्रण कक्षाचा क्रमांक असलेले स्टीकर्स लावण्यात येत असून उपक्रमाचा रविवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याहस्ते रेल्वे स्थानकाबाहेरील रीक्षा स्टॉपवर शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, पोलिसांकडून शहरातील रीक्षा चालकांचा वाहन परवाना, बिल्ला क्रमांक, तसेच रीक्षा वाहन परवाना (आर.सी.बुक) आदींची माहिती संकलीत केली जात असून आठवडाभरात ही माहिती शहर वाहतूक शाखेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती न देणार्‍या रीक्षांवर मुदत संपल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई होईल, असे उपअधीक्षक वाघचौरे यावेळी म्हणाले.

भुसावळात महिला प्रवाशांचा प्रवास होणार सुकर
राज्यातील महिलांवर ओढवणारे अप्रिय प्रसंग पाहता दिवसा-रात्री महिलांसह सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर व्हावा व अप्रिय घटनेची चाहुल लागताच तातडीने पोलीस प्रशासनाची मदत मिळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून व जळगाव अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व भुसावळचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरातील प्रवासी रीक्षांमध्ये भुसावळ शहर, बाजारपेठ व नियंत्रण ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक असलेले स्टीकर्स लावण्याच्या मोहिमेचा रेल्वे स्थानकापासून रविवारी सायंकाळी शुभारंभ झाला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रसंगी रीक्षा चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक स्वप्नील नाईक, संदीप राजपूत, सुनील शिंदे, ‘दैनिक जनशक्ती’चे संचालक यतीन ढाके आदींची उपस्थिती होती.

मुदतबाह्य रीक्षांचा प्रवास थांबणार
यापूर्वी पोलीस प्रशासनाकडे शहरातील रस्त्यावर धावणार्‍या रीक्षा व चालकांबाबत माहिती नव्हती मात्र आता ती उपलब्ध होणार आहे. रीक्षा चालकाचे नाव, नंबर, बिल्ला क्रमांक, वाहन तसेच रीक्षा परवाना आदी माहिती शहर वाहतूक शाखेकडून संकलीत केली जात आहे व माहिती देणार्‍या रीक्षांमध्ये पोलीस प्रशासनाकडून स्टीकर्स लावण्यात येत आहेत. ज्या रीक्षांवर पुढील आठवड्यापासून स्टीकर्स दिसणार नाही त्यांच्यावर धडक कारवाई होईल, असे उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले. या माध्यमातून अनधिकृतरीत्या व कालबाह्य झालेल्या रीक्षांचा प्रवास थांबणार असून अवैधरीत्या गॅस सिलिंडर लावून प्रवास करणार्‍या रीक्षांवरही कारवाई करणे सोपे होणार आहे. भुसावळ शहर वाहतूक शाखेकडून शहरातील प्रत्येक स्टॉपवरून धावणार्‍या रीक्षांचा डाटा संकलीत केला जाणार आहे.