भुसावळात अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट : लाखोंची उलाढाल ठप्प

0

भुसावळ (गणेश वाघ) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीया सणाला यंदा कोरोनाचे सावट आहे. वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक्स तसेच जमिनीसह घरांच्या खरेदीला यंदा ब्रेक लागल्याने भुसावळ शहरात लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा, दसरा, दिवाळी व अक्षय्यतृतीयेला वस्तू खरेदीची परंपरा आहे आहे मात्र यंदा गुढीपाडव्यानंतर अक्षयतृतीया सणालादेखील कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने व्यावसायीकांवर संकट कोसळले आहे तर हातावर पोट भरणार्‍यांची अधिक गैरसोय होत आहे.

भुसावळच्या सुवर्ण बाजारपेठेत शुकशुकाट
अक्षय्यतृतीयेचा दिवस शुभ मानून नागरीक हमखास सोन्याची खरेदी करतात त्यामुळे भुसावळातील सुवर्णबाजारपेठेत लाखोंची उलाढाल या दिवशी होते मात्र गुढीपाडव्यानंतर गुरूपुष्पामृत तसेच रविवारचा अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकल्याने सुवर्ण व्यावसायीकांवर मोठे संकट कोसळले आहे. लाखोंच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे शिवाय जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा वाढत असलेला आकडा पाहता 3 मे रोजी लॉकडाऊन उठेल अथवा नाही? याबाबत साशंकता कायम आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी सरकारने लादलेल्या अबकारी कराविरोधात भुसावळातील सुवर्ण व्यावसायीकांनी तब्बल 45 दिवस सुवर्णबाजारपेठ बंद ठेवली होती व त्यापूर्वी व नंतर मात्र बाजारपेठ बंद राहिल्याचा इतिहास नाही मात्र आता कोरोनामुळे एक महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बाजारपेठ ठप्प झाली आहे.

सुवर्ण कारागीरांना सराफांनी दिला मदतीचा हात
सुवर्णबाजारपेठेत हातावर पोट भरणार्‍या सुवर्ण कारागीरांवरही मोठे संकट कोसळले आहे. दररोज कमवा व खा अशीच काहीशी स्थिती असलेल्या सुवर्ण कारागीरांना अडचणीच्या काळात मात्र सराफा बांधवांनी मदतीचा हात दिला आहे.

सराफा व कारागीरांचे हाल : नाना विसपुते
अबकारी विरोधात सुमारे 45 दिवस सुवर्ण मार्केट बंद ठेवण्यात आले होते व त्यावेळी आम्ही एकमेकांना धीर देत सांभाळून घेतले मात्र आता सराफा व्यावसायीक व कारागीरांचे हाल होत आहेत. उद्योगधंदे बंद असल्याने मार्र्केटमध्ये पैसा नाहीच व मार्केट उघडल्यानंतरही स्थिती लगेच बदलेल, असे चित्र नाही. सोन्याच्या भावाचा आलेख वाढतच असल्याचे भुसावळ सराफ असोसिएशन अध्यक्ष नाना विसपुते ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.

आकस्मिक संकट : दीपक अग्रवाल
कोरोना हे देशावर कोसळलेले आकस्मिक संकट असून लॉकडाऊनमुळे सर्व व्यापार, उद्योगधंदे ठप्प आहेत. सुवर्ण बाजाराचा विचार केल्यास गुढीपाडवा, गुरूपुष्पामृत, अक्षयतृतीयाचा मुहूर्त हुकल्याने सराफा व्यावसायीकांसह सुवर्ण कारागीरांना मोठा फटका बसला असून उलाढाल ठप्प झाली आहे. अडचणीच्या काळात सराफांनी सुवर्ण कारागीरांना मदतीचा हात दिला असल्याचे भुसावळ सराफ व सुवर्णकार असोसिएशन प्रसिद्धी प्रमुख दीपक अग्रवाल ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायीकांना फटका
गुढीपाडवा व अक्षयतृतीया सणाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. टीव्ही, फ्रीज, कुलर, एसी आदी वस्तूंना मोठी मागणी असल्याने 40 ते 60 व्यवसाय या काळात होतो मात्र कोरोनामुळे इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायीकांना लाखोंचा फटका बसला आहे. दुकानातील कर्मचार्‍यांचे पगार तसेच बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत असल्याने या क्षेत्रातील व्यावसायीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहन बाजाराचा ‘रीव्हर्स गेअर’
अक्षयतृतीयेला नेहमीच वाहन बाजाराचा गेअर ‘टॉप’ असलातरी तरी यंदा कोरोनामुळे मात्र यंदा रीव्हर्स गेअर पडल्याची स्थिती आहे. बीएस- 4 वाहन विक्रीचे संकट डोक्यावर असतानाच आता पुन्हा महिन्याभरापासून लॉकडाऊन असल्याने व शोरूम बंद असल्याने वाहन विक्री करणार्‍या व्यावसायीकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. भुसावळात दुचाकी विक्रीची सुमारे पाच ते सात शोरूम असून चारचाकी विक्रीचेदेखील शोरूम आहे मात्र आता लॉकडाऊनमुळे बुकींगच नसल्याने लाखोंचा फटका वाहन क्षेत्राला बसला आहे.

गृहप्रवेश लांबला : गृहाचे बुकींगही ठप्प
अक्षय्यतृतीयेला नागरीक हमखास घराचे बुकिंग करतात. शिवाय अनेकजण गृहप्रवेश याच दिवशी करतात. अक्षय तृतीयेला बिल्डर्सला बुकिंगची अपेक्षा असते मात्र कोरोनामुळे बिल्डर्स बांधवांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. गुढीपाडवा वा अक्षय्यतृतीयाला देखील जमीन खरेदी-विक्री प्रक्रिया थांबली शिवाय घरांचे बुकींग थांबल्याने भुसावळातील बिल्डर्स बांधवांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

Copy