भुसावळातील 31 जणांना कोविड सेंटरमध्ये केले कॉरंटाईन

0

58 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी रवाना : भुसावळातील वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची वाढली चिंता

भुसावळ : कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सातत्याने शहरात वाढत असल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने व्यापक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली असून यापूर्वी कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या 58 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मृत बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना शनिवारी शहरातील कोविड सेंटरमध्ये कॉरंटाईन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भुसावळात झाले 12 कंटेन्मेंट झोन
शहरातील विविध भागात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याने हा परीसर पालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून सील केला आहे तर नव्याने काझी प्लॉट, इंदिरा नगर भागात रुग्ण आढळून आल्यानंतर हा भाग देखील सील करण्यात आला असून शहरात आता 12 कंटेन्मेंट झोन झाले आहेत.

कोविड सेंटरमध्ये 121 जणांना केले कॉरंटाईन
शहरात दोन दिवसांपूर्वी पॉझीटीव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 31 जणांना भुसावळातील कोविड सेंटरमध्ये कॉरंटाईन करण्यात आले आहे. यात यापूर्वी मयत झालेल्या तसेच शनिवारी मयत झालेल्या रुग्णांच्या क्लोज संपर्कातील संशयीत रुग्णांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी दिली. दरम्यान, कोविड सेंटरमध्ये कॉरंटाईन असलेल्या 58 लोकांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत तर एकूण 121 जणांना कॉरंटाईन करण्यात आले आहे तर निगेटीव्ह अहवाल आलेल्या सुमारे 40 जणांना सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन्य 200 नागरीकांचे स्वॅब घेणार : मुख्याधिकारी
शहरातील बाधीत रुग्णांच्या क्लोज संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून सुरू असलीतरी कोविड सेंटरमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसह गेल्या दिड महिन्यांपासून सातत्याने नागरीकांच्या संपर्कात आलेल्या भाजीपाला विक्रेता तसेच अन्य वयोवृद्ध नागरीकांचेही स्वॅब घेण्याचे प्रशासनाचे नियोजन असून आठवडेभरात अशा पद्धत्तीने 200 नागरीकांचे स्वॅब घेण्यात येतील, अशी माहिती मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिली.

Copy