भुसावळातील हेमंत पैठणकरसह तिघांची टोळी वर्षभरासाठी हद्दपार

जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी कलम 55 अधिकाराचा वापर करून काढले आदेश

भुसावळ : गुन्हेगारीमुळे राज्यभरात बदनाम झालेल्या भुसावळातील गुन्हेगारी तीन महिन्यात थोपवण्याचे आश्‍वासन पदभार घेतानाच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी देत गुन्हेगारांचा डाटा तयार करून हद्दपारीचे प्रस्तावही तयार केले या शिवाय तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या काळातही पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानंतर पोलिस अधीक्षकांनी गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी अ‍ॅक्शन घेतली आहे. पहिल्या टप्प्यात भुसावळातील पैठणकर टोळी एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली बुधवारी पोलिसांनी संबंधितांना हे आदेश बजावले तर उभयंतांनी दोन दिवसांची पोलिसांकडून जिल्ह्याबाहेर पडण्यासाठी मुदत मागितल्याने त्यांना ती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कलम 55 अधिकाराचा वापर करीत गुन्हेगारांना हद्दपार केले असून आगामी काळात आणखी काही गुन्हेगार व टोळ्या पोलिसांच्या रडारवर असून प्रत्यक्ष त्याचे परीणाम शहरवासीयांना दिसतील, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

यांची जळगाव जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपारी
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण डॉ.मुंढे यांनी टोळी प्रमुख हेमंत जगदीश पैठणकर (26, रा.गरूड हॉस्पीटलजवळ, भुसावळ), चेतन उर्फ गोल्या पोपट खडसे (28, रा.हनुमान नगर, भुसावळ) व तिसरा प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (28, रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) यांना वर्षभरासाठी हद्दपार करण्याबाबत आदेश काढले असून संबंधितांना नोटीसा बुधवारी बजावण्यात आल्या.

तीनही आरोपींविरुद्ध डझनभर गुन्हे
हद्दपार हेमंत पैठणकरविरुद्ध खंडणी, जबरी चोरी, लूट यासह नऊ गुन्हे दाखल आहेत तर
चेतन खडसे विरूध्द हाणामारी, आर्म अ‍ॅक्ट, मारामारी आदी प्रकरणी तीन तसेच
प्रशांत चौधरीविरूध्द दरोडो, खूनासहीत दरोडा टाकणे, हाणामारी करणे, चोरी, लूट आदी प्रकाराचे 11 गुन्हे दाखल आहेत. बाजारपेठचे तत्कालीन निरीक्षक दिलीप भागवत यांनी 10 नोव्हेबर 2020 या दिवशी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळीविरुद्ध कारवाईबाबत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. संबंधितांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वर्षभरासाठी हद्दपारीचे आदेश काढले तर बुधवारी सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, अनिल पाटील, विकास सातदिवे यांनी तिघांना नोटीस बजावली.

भुसावळकरांना दिलेला शब्द करणार खरा : पोलिस उपअधीक्षक
भुसावळातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठीचा दिलेला शब्द निश्‍चितच खरा करणार असून त्यानुषंगाने पहिली टोळी आता वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आली आहे. लवकरच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या गुन्हेगारांसी टोळ्यादेखील हद्दपार होतील, असा विश्‍वास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केला. शहरात कुणाचीही दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही, शहरात आता कायद्याचे राज्य राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Copy