Private Advt

भुसावळातील स्टेट बँकेची दिड कोटींची फसवणूक : 17 जणांविरोधात गुन्हा

घर वा इमला नसतानाही बनावट सौदे पावत्यांद्वारे लाटले कर्ज : मिळकतीचे दाखवले अधिक मुल्यांकन

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बँकेच्या दोन अधिकृत व्हॅल्यूअरसह 17 कर्जदारांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बँकेत वाटप झालेल्या बोगस कर्ज वाटपाबाबत वरीष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्यानंतर वरीष्ठ स्तरावरून चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला.

अनेक धक्कादायक बाबी उघड
विशेष म्हणजे बँकेची कर्ज वाटपात फसवणूक करताना बँकेच्या अधिकृत व्हॅल्यूअरची प्रमुख भूमिका राहिल्याचे दिसून आले. कर्जदाराच्या मिळकतीचे बाजार भावापेक्षा अधिक मूल्यांकन दाखवणे, मिळकतीवर घर वा इमला नसतानाही तो बांधला असल्याचे दर्शवून वाढीव किंमतीचे मूल्यांकन सादर करणे तसेच खोट्या सौदे पावतीच्या आधारे कर्ज लाटण्याची धक्कादायक बाब बँकेने केलेल्या सखोल चौकशीत स्पष्ट झाली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, 23 मार्च 2018 ते 16 जून 2019 दरम्यान स्टेट बँक आनंद नगर शाखेत मॅनेजर म्हणून विशाल इंगळे तर 17 जून 2019 ते 28 डिसेंबर 2020 दरम्यान मॅनेजर म्हणून नंदलाल बाबूलाल पाटील होते. उभयंतांच्या कार्यकाळात बँकेची फसवणूक झाल्याची तक्रार झाल्यानंतर जळगावचे मुख्य प्रबंधक सुरेश सोनवणे यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्यात स्टेट बँकेची एक कोटी 49 लाख 21 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवार, 7 रोजी भुसावळ स्टेट बँकेचे विद्यमान मॅनेजर बँकेचे मनोज प्रेमदास बेलेकर (सुदर्शन कॉलनी, नागपूर, ह.मु.भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार व्हॅल्यूअरसह 17 कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या 17 आरोपींविरोधात दाखल झाला गुन्हा
आसीफ हुसेन गवळी (द्वारका नगर, भुसावळ), माजीद खान इद्रीस खान (भुसावळ), निलेश जय सपकाळे (बुद्धवाडा, कन्हाळा, ता.भुसावळ), पंकज भिकनराव देशमुख (पंचशील नगर, भुसावळ), राजेश निवृत्ती मेहरे (गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ), शोभा पोपट पगारे (यावल रोड, राहुल नगर, भुसावळ), संदीप पुजाराम मैराळे (खडका, ता.भुसावळ), संतोष बबन सूर्यवंशी (रामदासवाडी, खडका रोड, भुसावळ), अफसाना बानो कलीम खान (द्वारका नगर, भुसावळ), गजानन रमेश शिंपी (नेब कॉलनी, भुसावळ), शाह शकीर चंद (मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ), शशीकांत रमाकांत अहिरे (फुलगाव, ता.भुसावळ), शकील इमाम गवळी (कन्हाळे बु॥., ता.भुसावळ), शाह अरबाज शाह अब्बास (पंचशील नगर, भुसावळ), बँकेचे व्हॅल्यूअर समीर बेले (दुसरा मजला, रयल हब बिल्डींग, जिल्हा न्यायालय, मालेगाव), बँकेचे व्हॅल्यूअर अशोक दहाड (183, नवी पेठ, एमजी रोड टॉवरजवळ, जळगाव), कमलाबाई प्रकाश बोरसे (पीओएच कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.