भुसावळातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण मांडळकर यांचे निधन

भुसावळ : शहरातील राजेश्‍वर नगरातील रहिवासी जय गणेश फाऊंडेशनचे समन्वयक व रोटरीचे माजी अध्यक्ष तथा महाराजणा प्रताप विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण शांताराम मांडळकर (74) यांचे निमोनिया आजाराने बुधवार, 2 जून रोजी दुपारी 1.40 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परीवार आहे. दरम्यान, मांडळकर सरांच्या अकाली निधनाने भुसावळातील सांस्कृतिक वैभव हरपले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनानंतर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

सांस्कृतीक चळवळीत मोठे योगदान : स्मशानभूमीचाही केला कायापालट
जिभेवर सरस्वती असलेल्या अरुण मांडळकर सरांचे भुसावळातील सांस्कृतिक चळवळीतदेखील मोठे योगदान राहिले आहे. दोन वेळा रोटरीचे अध्यक्ष राहून चुकलेल्या मांडळकर हे उत्कृष्ट कबड्डीपट्टू देखील होते शिवाय भुसावळातील प्रत्येक क्षेत्रात हिरारीने भाग घेवून त्यांनी नावलौकीक मिळवला होता. शहरातील यावल रोडवरील मुख्य स्मशानभूमीचा त्यांनी जय गणेश फाऊंडेशनच्या माध्यमातून कायापालट केला. दर रविवारी सेवा देवून स्मशानभूमी परीसरात जगवण्यात आलेली वृक्ष वाढवण्यामागे सरांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या अकाली निधनाने शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.