भुसावळातील श्री नगर भागात डेंग्यूचे सर्वेक्षण

0

भुसावळ : शहरात बर्‍याच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. विरोधी तथा सत्ताधारी नगरसेवकांनी तक्रारी करूनसुद्धा उपाययोजना झाल्या नाहीत शिवाय कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने संपूर्ण देशाला होरपळून काढले आहे त्यातच आता कालबाह्य यंत्रणा व नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरीकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सहाय्यक सुनील महाजन यांच्याकडे भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शनिवार, 16 मे रोजी आरोग्य सहाय्यक सुनील महाजन, आरोग्य सेवक ज्ञानदेव चोपडे, आकाश सपकाळे, प्रशांत चौधरी यांनी जळगाव रोड विभागात जागतिक डेंग्यू दिनाच्या निमित्ताने श्रीनगर भागातून सर्वेक्षण सुरू केले.

कोरडा दिवस पाळा
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार एडीस इजिप्टी या डासांच्या मादीपासून होतो. साधारणत: जून ते ऑक्टोबर या कालावधीत याचा जास्त प्रसार होतो. कारण या कालावधीमध्ये पाऊस पडत असल्यामुळे अनुकुल वातावरण असते. हा डास तुलनेने इतर डासांपेक्षा लहान असतो. या आजारावर निश्चित असा औषधोपचार नसल्यामुळे अटकाव करणे हा एकमेव मार्ग आपल्या हातात आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. परिसरात असलेला केरकचरा एकत्रिक करून जाळून नष्ट करणे. डबकी असल्यास ती त्वरी बुजविणे. कोरोनामुळे वारंवार हात धुवावे लागत आहे परंतु आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून स्वच्छ करत कोरडा दिवस पाळणे यासह इतर काही उपाययोजना केल्यास या आजाराला सहजपणे प्रतिबंध घालता येऊ शकतो, अश्या सूचना यावेळेस देण्यात आल्या. माहिती पत्रके वाटप करण्यात आली.

दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे काळजी घ्या
कोरोनाबाबतीत काळजी घेत असतांना नागरीकांनी दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना पाळत डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती रोखण्यावर भर द्यावा, स्वत: लक्ष घालून घरातील पाण्याची भांडी स्वच्छ करावी व पाण्यामध्ये डासांच्या अळ्या नसल्याची खात्री करावी. जेणेकरून या आजारापासून बचाव करणे शक्य होईल, अशी जनजागृती प्रा.धीरज पाटील यांनी परीसरात केली. अमोल पाटील, अजय सोनवणे, राजेंद्र खैरनार, रमेश खैरनार, प्रदीप राणे, गणेश पाटील, सचिन वारके, विक्की कोळी, हर्षल पाटील, प्रकाश भोई, काशीनाथ सोनवणे यांनी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात सहकार्य केले.

Copy