भुसावळातील शिवाजी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकानात चोरी

0

भुसावळ : शहरात एकाच दिवशी दोन चोरीच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समील मोबाईल दुकानातून चोरट्यांनी तीन मोबाईल लांबवले तर दुसर्‍या घटनेत शाळेचे आठ हजार रुपये किंमतीचे चॅनल गेट चोरीला गेले.

चोरटे सीसीटीव्हीत कैद
जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील श्री साई मोबाईल शॉपी या दुकानाचे दोन्ही कुलूपे चोरट्यांनी तोडत गुरूवारी पहाटे 2.12 ते 2.19 अवघ्या सात मिनीटात दुकानात ग्राहकाचे दुरूस्तीसाठी आलेले मोबाईल चोरून नेले. अवघ्या सात मिनीटात चोरट्याने 30 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल चोरले. चोरट्याचे हे कृत्य दुकानातील सीसीटिव्ही मध्ये कैद झाले आहे. गुरूवारी सकाळी दुकानाचे मालक रवींद्र प्रकाश बाविस्कर यांना त्याच्या शेजार्‍याने मोबाईल दुकानात चोरी झाल्याची माहिती दिल्याने बाविस्कर यांनी तात्काळ दुकानात धाव घेतली.

शाळेचे आठ हजारांचे चॅनल गेट लांबवले
शिवाजी नगरातील पालिकेच्या शाळा क्रमांक 22 मध्ये चोरट्यांनी तेथील आठ हजार रुपये किंमतीचे चॅनल गेट लांबवले. शाळा 31 मार्चपासून बंद असल्याने शाळेकडे कोणीही गेले नाही मात्र गुरूवारी शाळेचे मुख्याध्यापक मुसाखान इसा खान हे शाळेकडे गेले असता त्यांना शाळेचे चॅनल गेटची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy