भुसावळातील वंचितांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य

0

भुसावळ : सामाजिक भावनेतून ओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फेभुसावळ शहरातील अति गरजू, पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर फिरणार्‍यांना एकत्र करून भुसावळ नगरपरीषद संचालित श्री संत गाडगेबाबा महाराज नगरपालिका दवाखान्यात आणण्यात आले व येथे त्यांची साबण व शॅम्पुने अंघोळ घालण्यात आली. दाढी व कटींग केल्यानंतर या लोकांना भुसावळ रमण भोळे यांच्या वतीने सर्वांना कपडे तसेच बिस्कीट देण्यात आले तसेच स्वच्छता किटही प्रतिष्ठानतर्फे देण्यात आले. गेल्या अनेक दिवसांनंतर या गरजूंना अचानक मदतीचा हात मिळाल्याने वंचितांच्या चेहर्‍यावर आनंदही पसरला.

उपक्रमासाठी यांचे लाभले सहकार्य
भुसावळ पालिका दवाखान्यात सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली नंतर परत त्यांना जेवणाचे डबे देण्यात आले. यावेळी विघ्नहर्ता पब्लिकेशनचे रवींद्र निमाणी, पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांची विशेष उपस्थिती होती. या उपक्रमासाठी मंगेश निकम, रीक्षा वाहक किरण पाटील यांची मोलाची मदत लाभली तर प्रतिष्ठान खजिनदार प्रसन्न पाटील, सदस्य निलेश मालविया, हर्षल बोरनारे, पारस सरोदे, संदीप चौधरी, राज गुजराती, नासीर याकूब, संजय ठाकूर यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

देवकार्याचे समाधान : डॉ.नि.तु.पाटील
स्वच्छता उपक्रम हा आम्ही प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता आणि तो यशस्वी झाला आहे. आता तो मोठया प्रमाणावर राबविण्याचा मानस आहे. माझ्या सर्व सहकारी मित्रांमुळेच हा उपक्रम उत्तमरीत्या पार पडला. विशेष म्हणजे भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे जेव्हा परवानगी काढायला गेलो तेव्हा लागलीच त्यांनी त्यासाठी आर्थिक मदत करत उपक्रमाला पाठबळ दिले असल्याची भावना ओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.नि.तु.पाटील यांनी व्यक्त केली.

Copy