Private Advt

भुसावळातील लाचखोर महिला अव्वल कारकुनास तीन दिवसांची पोलीस कोठडी

लाच प्रकरणात काहींची चौकशी होण्याची शक्यता : लाचखोरांच्या गोटात खळबळ

भुसावळ : प्लॉट एन.ए.करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्रतिभा मच्छींद्र लोहार (42, रा.शिव कॉलनी, जळगाव) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने मंगळवार, 5 रोजी दुपारी अटक केली होती. लोहार यांना अटक केल्यानंतर अधिक तपासासाठी त्यांना जळगाव एसीबीच्या ताब्यात देण्यात आले होते. बुधवार, 6 रोजी लोहार यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, लोहार यांनी कुणाच्या सांगितल्यावरून लाच मागितली होती शिवाय या प्रकारात आणखी कुणाचा सहभाग आहे वा नाही? याची चौकशी जळगाव एसीबीकडे आता केली जाणार आहे.

संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
भुसावळातील 41 वर्षीय तक्रारदार यांनी भुसावळ नगरपालिका हद्दीत स. न. 35/2 प्लॉट नं. 8 क्षेत्र 30.265 चौरस मीटर या प्लॉटची बिनशेती परवानगी मिळण्याकरीता प्रांताधिकारी कार्यालयात प्रकरण सादर केले होते. हे काम करून देण्यासाठी संशयीत आरोपी प्रतिभा लोहार यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी संदर्भात थेट नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवली व त्यानंतर सापळा रचला मात्र 17 सप्टेंबर 2021 रोजी पथक आल्यानंतर लोहार यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने वरीष्ठांच्या आदेशानुसार मंगळवार, 5 रोजी लोहार यांना सकाळी अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा अधिक तपासासाठी जळगाव एसीबीकडे सोपवण्यात आला तर लोहार यांना जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले होते.