भुसावळातील रस्त्यांसह पाण्याचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन

0

भुसावळ : शहरवासीयांना गेल्या महिनाभरापासून होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, शहरील वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत कॉलनी भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व अमृत योजनेच्या बंधार्‍याचे असलेले भिजत घोंगडे आदी प्रश्‍न घेवून शिवसेना पदाधिकार्‍यांनी आक्रमक होत मंगळवारी पालिका प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने करीत सत्ताधार्‍यांवर टिकेची झोड उठवली. आठ दिवसात समस्या न सुटल्यास पालिकेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी पालिकेचे अधिकारी कातोरे यांना निवेदन देण्यात आले.

अशुद्ध पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात
भुसावळ शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून नागरीकांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात ऊन शहरातील नागरीकांना अशुद्ध पाण्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोनामुळे नागरीक हवालदिल झाले असून अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे भुसावळ शहरातील नागरीकांना पोटाचे विकार सुरू झाले आहे.

शिवसेना पदाधिकार्‍यांची सत्ताधार्‍यांवर टिका
भुसावळ नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता असून सत्ताधार्‍यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे भुसावळ शहरातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये अमृत योजनेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले शिवाय गावभर मोठ-मोठाली बॅनर लावून प्रसिद्धी करण्यात आल मात्र तीन वर्ष उलटॅनही योजनेचे काम नियोजनशून्य सत्ताधार्‍यांमुळे पूर्ण झालेले नाही शिवाय 11 जलकुंभाचे कामही पूर्णत्वास आलेले नाही. योजनेच्या पाईप लाईनमुळे रस्त्यांची मात्र दुरवथा झाली. तापी नदी पात्रामध्ये अद्यापही बंधार्‍याचे काम झालेले नाही.

शहरातील रस्त्यांची झाली चाळण
भुसावळ शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहन धारकांना गाडी चालवताना खूप कसरत करावी लागत आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखल झालेला आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रकार वाढले आहेत. बहुतांश नागरीकांना मणक्याचे विकार व मानेचे विकार सुरू झाले आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने या आधी सुद्धा भुसावळ नगर पालिकेला निवेदन देण्यात आलेली आहे परंतु निगरगट्ट सत्ताधार्‍यांना त्याचा काही एक फरक पडलेला नाही. या सर्व बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून येत्या आठ दिवसांत भुसावळ शहरातील खड्डे बुजवावे व नागरीकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा भुसावळ शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसैनिक व जनतेला सोबत घेऊन भुसावळ नगरपालिकेची प्रतीकात्मक स्वरूपात अंत्ययात्रा काढतील, असा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी तालुकाप्रमुख समाधान महाजन, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, निलेश महाजन, दीपक धांडे, प्रा.धीरज पाटील, पूनम बर्‍हाटे, जग्गू खेराडे, पवन नाले, देवेंद्र पाटील, नरेंद्र लोखंडे, पिंटू भोई, ललितकुमार मुथा यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Copy