भुसावळातील रस्त्यांसह ‘अमृत’चा प्रश्‍न सोडवणार

0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भुसावळातील खाजगी कार्यक्रमात ग्वाही : पालिकेतील परत गेलेल्या निधीचीही होणार चौकशी

भुसावळ : भुसावळ शहरात अमृत योजना का रखडली वा यात कोण दोषी आहे? याची माहिती घेणार असून निश्‍चित यात कारवाई होईल व अमृत योजनेचा प्रश्‍न मार्गी लागेल तसेच प्रशासकीय स्तरावर रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली. एका खाजगी कार्यक्रमानिमित्त ते भुसावळात शनिवारी आले असता प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, या कार्यक्रमानंतर मंत्री पाटील यांनी डीआरएम यांची भेट घेत पाळधीच्या शेंगदाणे विक्रेत्यांना रेल्वे सुरक्षा बल व पोलिसांकडून त्रास होत असल्याने तातडीने हे प्रकार बंद न झाल्यास गाठ आपल्याशी असल्याचा इशाराच त्यांनी दिला. यानंतरदेखील हे प्रकार न थांबल्यास आपण रेल्वेत चढू व सर्व अवैध धंदे बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिल्याने रेल्वे अधिकार्‍यांसह रेल्वे सुरक्षा बलात मोठी खळबळ उडाली.

डीपीडीसीच्या बैठकीत घेणार आढावा
भुसावळातील अमृत योजनेचे तीन वर्षानंतरही काम झाले नसल्याने दोषींवर कारवाई करणार का? या प्रश्‍नावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात अमृत योजनेचा आढावा घेतला जाईल व यात दोषी कुणीही असो त्यांच्यावर निश्‍चित कारवाई करू, असेही ते म्हणाले. भुसावळ पालिकेत रस्त्यांसाठी आलेला 12 कोटींचा निधी पुन्हा परत गेला असून प्रशासकीय मान्यतेअभावी रस्त्यांची कामे खोळंबली असल्याची माहिती पाटील यांना दिल्यानंतर 20 जानेवारी रोजी आयोजित डीपीडीसीच्या बैठकीत याची चौकशी करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

लॉबींग नसतानाही मिळाले मंत्री पद
सेना-भाजपाची युती झाली असतीतर किमान 20-22 मंत्री पदे मिळाली असती मात्र तीन पक्षांना मिळून सरकार बनवावे लागले व आपल्यामागे कुठलेही लॉबींग नसताना मंत्री पदाची संधी मिळाली कारण स्पष्टवक्ता ही आपल्या स्वभावाची ओळख असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. एका खाजगी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. गुलाबराव म्हणाले की, प्रेम वाटले तर प्रेम मिळते याचा प्रत्यय आमदारकीच्या व नगरपालिका निवडणुकीत आला. मुस्लीम समाजाने सर्वाधिक मतदान करून मला व शिवसेना उमेदवाराला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निवडून आणल्याचे ते म्हणाले. आज मंत्री झालो असलोतरी आपल्याला काहीही बदल झालेला नाही. 800 स्वेअर फुटांच्या घरातच आपण राहतो व जनतेच्या सेवेसाठी नेहमीच उपलब्ध असतो, असेही ते म्हणाले.

होय, पाणी भोवल्यानेच भाजपा उमेदवाराचा पराभव
पालिकेच्या पोटनिवडणुकीत ‘पाणी’ भोवल्यानेच भाजपा उमेदवाराचा पराभव झाल्याची प्रांजळ कबुली आमदार संजय सावकारे यांनी येथे दिली. ते म्हणाले की, जनतेला ज्या कामांसाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे ती कामे न केल्यास जनता घरी बसवते, असे सूचक विधानही त्यांनी करीत पालिकेतील सत्ताधारी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शहरात आयोजित एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते. युतीचे सरकार आले असतेतर अधिक बरे झाले असते, असे सांगुन पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कामाला न्याय देणारे लोकप्रतिनिधी असून ते चांगल्या-चांगल्यांना पाणी पाजू शकतात, असेही ते म्हणाले.

मी रेल्वेत चढल्यास अवैध धंदे बंद पाडणार
चुकीच्या कामासाठी मी कधीही आपल्याकडे येणार नाही मात्र मी पत्र दिल्यावरही पाळधीच्या शेंगदाणे विक्रेत्यांवर पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई होत असेल तर हे बरोबर नाही व यापुढे या गोरगरीब विके्रत्यांवर कारवाई झाल्यास मी माझ्या स्टाईलने काम करेल, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी डीआरएम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिल्याने अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली. मला रेल्वेत चढण्यास भाग पाडू नका, अन्यथा सर्व अवैध धंदे बंद करून दाखवेल, असा इशाराही त्यांनी देवून टाकला. पाळधी ते अमळनेर पॅसेंजरमध्ये शेंगदाणे विके्रत्यांना आरपीएफकडून त्रास दिला जात असून रेल्वेच्या नियमानुसार विक्रेत्यांना हॉकर्सचे परवाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शेंगदाणे विक्री बंद झाल्यास या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येवून बेरोजगारी वाढेल, असेही ते म्हणाले. प्रसंगी नगरसेवक मनोज बियाणी सोबत होते.

Copy