Private Advt

भुसावळातील मॉल फोडणार्‍या मथुरेतील चोरट्यांना बेड्या

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी अटकेतील दोघा आरोपींना न्यायालयाने सुनावली 19 पर्यंत पोलिस कोठडी

भुसावळ : शहरातील मॉडर्न रोडवरील हरेकृष्णा मॉल, गुरूनानक क्लॉथ स्टोअर्स व गोपी सुपर शॉपिंग मॉलमध्ये एकाच वेळी चोरी झाल्याची घटना मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे उघडकीस आली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे उत्तरप्रदेशातील मथुरा येथून दोन संशयीतांना अटक केली आहे. कलवा नबाब खान (23, किशोर पाडा, रुंदावन मथुरा, उत्तरप्रदेश) व श्यामकुमार प्रदीप सैनी (27, आशा नगर, मेहंदी पार्क, मथुरा, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींना गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

नऊ लाखांच्या मुद्देमालाची केली होती चोरी
मॉडर्न रोडवरील हरेकृष्ण मॉलमधून 45 हजारांची रोकड तसेच अन्य साहित्य तसेच गुरूनानक क्लॉथ स्टोअर्समधून एक लाख 75 हजारांची रोकड तसेच गोपी सुपर शॉपिंग मॉलमधून एक लाख 58 हजार रुपयांची रोकड तसेच तीन लाखांचे महागडे रेडिमेड कपडे लांबवण्यात आले होते. रोकडसह नऊ लाखांचा मुद्देमाल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासानंतर आरोपींना पडल्या बेड्या
भुसावळातील तीन मॉलमध्ये झालेल्या चोरीनंतर एका मॉलमध्ये चोरट्यांची छबी कैद झाली होती. पोलिसांनी यानंतर बसस्थानक व रेल्वे स्थानकावरील फुटेज तपासल्यानंतर चोरटे अकोल्याकडे जाणार्‍या रेल्वेत बसल्याचे निष्पन्न झाले व त्यानंतर अकोला मार्गावरील रेल्वे स्थानकांची पोलिस पथकाने तपासणी केल्यानंतर अकोला रेल्वे स्थानकावर चोरटे उतरल्याचे स्पष्ट झाले व नंतर पोलिसांनी अकोल्यातील लॉज तपासल्यानंतर त्यात एका लॉजमध्ये त्यांनी मुक्काम केल्याचे स्पष्ट झाले व लॉजमध्ये दिलेल्या पुराव्यादाखल मिळालेल्या आय.डी.नंतर पोलिसांनी मथुरेतून दोघांच्या मुसक्या आवळल्या तर अन्य दोघे पसार होण्यात यशस्वी झाले.

आरोपींना दुसर्‍यांदा पोलिस कोठडी
मथुरा येथे पोलिसांच्या पथकाने आठ दिवस सापळा रचल्यानंतर संशयीतांना 11 रोजी ताब्यात घेण्यात आले व 14 रोजी त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना 17 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर गुरुवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर भुसावळ अतिरीक्त न्यायालयात हजर केले असता. दोन दिवसांची अर्थात 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत आरोपींच्या ताब्यातून पाच हजार नऊशे रुपयांची रोकड तसेच चोरी केलेले काही कपडे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगिलते.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाजन, हवालदार विजय नेरकर, सचिन चौधरी, जीवन कापडे, सचिन पोळ, प्रशांत लाड आदींच्या पथकाने केली.