भुसावळातील महिलेने व्हेंटीलेटरअभावी गमावले प्राण

0

भुसावळ : शहरात एप्रिल महिन्यात प्रथमच पॉझीटीव्ह आढळून आलेल्या 38 वर्षीय महिलेचा सोमवारी रात्री गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेस सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्यानंतर तिने कोरोनावर मातही केली होती मात्र सोमवारी अचानक या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले मात्र व्हेंटीलेटर नसल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सोमवारी रात्रीच या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

समता नगरात पसरली शोककळा
मृत महिला विद्यार्थ्यांच्या शिकवणी घेवून आपल्या कुटुंबाचा चरीतार्थ चालवत होती. 25 एप्रिल रोजी या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती शिवाय शहरात प्रथमच कोरोना पॉझीटीव्ह आढळलेली ही महिला असल्याने प्रशासनाने सर्व खबरदारी बाळगत या भागात कंटेन्मेंट झोन तयार केला होता शिवाय महिलेवर यशस्वी उपचार झाल्याने तिने कोरोनावर विजयही मिळवला होता मात्र सोमवारी या महिलेला अत्यवस्थ वाटू लागल्यानंतर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र नॉन कोविड रुग्णांसाठी व्हेंटीलेटर नसल्याने श्‍वास घेण्यास अधिक त्रास होत असल्याने या महिलेचा मृत्यू ओढवला.

तर महिलेचा जीव वाचला असता : उल्हास पगारे
राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे म्हणाले की, या महिलेला निमोनिया झाल्याने त्यांना गोदावरील हलवण्यात आले मात्र नॉन कोविड रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची सोय नसल्याने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनीदेखील प्रयत्न केले मात्र यश आले नाही. वेळेत या महिलेस व्हेंटीलेटर मिळाले असतेतर कदाचित महिलेचे प्राण वाचले असते. शासनाने नॉन कोविड रुग्णांसाठीदेखील व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्याची मागणी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आपण केली असून शासनाने आता दखल घेणे गरजेचे असल्याचे पगारे म्हणाले.