भुसावळातील बेपत्ता वयोवृद्धा जळगावात आढळली

0

भुसावळ : भुसावळातील नवोदय रुग्णालयातील कोविड सेंटरमधून 60 वर्षीय वयोवृद्धा बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघड झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. वृद्धा बेपत्ता झाल्याबाबत शहर पोलिसात नोंददेखील रात्री करण्यात आली होती तर वृद्धेच्या होमगार्ड असलेल्या मुलाने मित्राच्या मदतीने आईचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर जळगावातील राजकमल टॉकीजजवळ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही वयोवृद्धा आढळल्याने कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान, वृद्धा बेपत्ता झाल्याच्या प्रकारामुळे कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभार समोर आला असून या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून भुसावळातील पॉझीटीव्ह अहवाल आलेली वयोवृद्धा सुरूवातीला बेपत्ता व काही दिवसानंतर रुग्णालयाच्या शौचालयात मयत आढळल्याची घटना उघडकीस आल्याची घटना ताजी असतानाच भुसावळातदेखील वृद्धा बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर जळगाव प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.

जळगावात हलवण्यापूर्वीच वृद्धा झाली बेपत्ता
वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील साकरी फाटा परीसरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय वृद्धेला नवोदय कोविड सेंटरमध्ये रविवारी दाखल करून कॉरंटाईन करण्यात आले होते व सोमवारी स्वॅब घेवून ते तपासणीसाठी रवाना करण्यात आले होते मात्र वृद्धा मनोरुग्ण असल्याने दोन ते तीन वेळा तिने कॉरंटाईन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेसह कर्मचार्‍यांना केल्या होत्या. सदर वृद्धेला आम्ही सोमवारीच मानसोपचार तज्ज्ञाकडे हलवण्याची तयारी केली होती मात्र या वृद्धेचा मुलगाही रुग्णालयात दाखल असल्याने व त्याच्यावर उपचार सुरू असल्याने शिवाय या वृद्धेचा दुसरा मुलगाही होमगार्ड असल्याने त्यानेदेखील कर्तव्यावर असल्याची अडचण सांगितली होती व मंगळवारी आईला जळगाव हलवू, असे सांगितल्याने आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला होता. मंगळवारी सकाळी वृद्धेला जळगाव हलवले असावे, असे आम्हाला वाटले मात्र सायंकाळी वृद्धेच्या मुलाने आईबाबत विचारणा केल्यानंतर वृद्धा बेपत्ता असल्याची बाब पुढे आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र वृद्धा न आढळल्याने आम्ही याबाबत रात्री उशिरा शहर पोलिसात हरवल्याची नोंद केली असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य प्रशासनाने नाचवले होते वरातीमागून घोडे !
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10.30 वाजेनंतर वृद्धा बेपत्ता झाली (तत्पूर्वी वृद्धेने नास्तादेखील केला) व सायंकाळी साडेसहा वाजता वृद्धेच्या होमगार्ड असलेला मुलगा कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर आईबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला मात्र या काळात कर्तव्यावर असलेली यंत्रणा करीत होती तरी काय? असा प्रश्‍न आहे. रुग्णालयात नियुक्त असलेले अधिकारी व नियुक्त स्टॉप, होमगार्ड आदींनी वृद्धा बाहेर पडत असताना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? की यंत्रणा झोपेत होती? असा प्रश्‍न आहे. मुळात कॉरंटाईन केलेल्या सेंटरमधून एखादा संशयीत रुग्ण बाहेर पडत असल्यास संबंधीत यंत्रणेने त्यास अटकाव करणे तितकेच गरजेचे आहे शिवाय अद्याप या वृद्धेचा अहवाल येणे बाकी असल्याने वृद्धा नेमकी कुणाच्या संपर्कात आल्यास त्यास जवाबदार कोण? असा प्रश्‍न आहे. याहून गंभीर मुद्दा असा की, जर वयोवृद्धा मनोरुग्ण होती तर त्यांना दोन दिवस कोविड सेंटरमध्ये का ठेवण्यात आले, दाखल करतानाच का जळगाव हलवण्यात आले नाही? असा प्रश्‍न उपस्थित करण्यास वाव आहे. या बाबीला जवाबदार असलेल्या दोषींवर आता कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जळगावातील घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या
भुसावळच्या मालती नेहते (82) या वृद्धेची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आल्याने उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र 2 जून रोजी त्या रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने मालती नेहते यांचे नातू हर्षल नेहते यांना दिली होती त्यानंतर हर्षल नेहते यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर नेहते हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती तर मालती नेहते या वयोवृद्धेचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात सापडल्याची माहिती दिल्यानंतर रुग्णालयाच्या कारभाराबाबत टिकेची झोड त्यावेळी उठली होती व दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी पुढे आली होती.

जळगाव प्रकरणात आठ जणांचे झाले होते निलंबन
कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल भुसावळातील वृद्धेचा शौचालयात मृत्यू झाल्यानंतर महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आसीफ शेख यांना निलंबित करण्यात आले होते तर निलंबित होण्यापूर्वी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी तीन स्वच्छता कर्मचार्‍यांनाही निलंबीत केल्याने त्यावेळी या प्रकरणात एकूण आठ जणांचे निलंबन झाल्याची बाब पुढे आली होती.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार : आमदार संजय सावकारे
रात्री उशिराच घटना कळाली असून घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर निश्‍चित कारवाई होणे गरजेचे आहे व बुधवारी आपण जिल्हाधिकारी, डीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

अधिकार्‍यांनी जाणून घेतली माहिती
वयोवृद्धा बेपत्ता झाल्याच्या गंभीर प्रकारानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी कोविड सेंटरला भेट देवून नेमक्या झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. काही कर्मचार्‍यांशी त्यांनी चर्चा देखील केली.

जळगावात आढळली वयोवृद्धा
भुसावळ कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली वयोवृद्धा जळगावच्या राजकमल टॉकीजजवळ वयोवृद्धेच्या होमगार्ड असलेल्या मुलासह त्याच्या मित्राला आढळली. त्यानंतर शहर पोलिसांसह वैद्यकीय प्रशासनाला याबाबत माहिती कळवण्यात आली. वयोवृद्धेला घेण्यासाठी भुसावळातून रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

Copy