भुसावळातील पाच लाखांच्या खंडणी प्रकरणी अजय गोडाले अटकेत

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : संशयीतास भुसावळ न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ : महिलेला अश्लील क्लिप पाठवल्यानंतर त्या बदल्यात तडजोडीपोटी पाच लाखांची खंडणी मागत रक्कम न दिल्याने व्यापार्‍यास मारहाण करत बळजबरीने नोटरीद्वारे त्याची 18 लाख रुपये किंमतीची चारचाकी बळकावण्यात आली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजय अजय गोडाले यास बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी रात्री पाडळसे येथून अटक केली आहे. दरम्यान, आरोपी गोडाले यास रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अश्‍लील क्लीपप्रकरणी बळकावली होती चारचाकी
व्यापारी निलेश दिगंबर चौधरी (48, रा.श्रीनगर, लोणारी हॉलजवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवार, 29 जुलै रोजी सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान ते त्यांच्या मित्रासह बुलेटवरून पिंप्रीसेकम शिवारातील शेतात चक्कर मारण्यासाठी जात असताना वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीजवळ संशयीत लीना तल्लारे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकी अडवत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चौधरींनी हाताला झटका देत नवजीवन कॉम्प्लेक्सचे बुकिंग ऑफिस गाठले. त्यावेळी तल्लारेने अजय गोडाले याला फोन करून बोलावले. यानंतर अजय गोडाले, शुभम पचेरवाल व अन्य अनोळखी व्यक्ती तेथे आला. त्यांनी तल्लारे यांना अश्लील क्लिप पाठवल्याने तडजोड म्हणून पाच लाख रुपये द्यावे, अशी मागणी चौधरींकडे केली. चौधरींनी रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर पचेरवाल याने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी तल्लारेने नोटरी करणार्‍या वकिलास बोलावून जबरदस्तीने 18 लाख रुपये किमतीची टाटा हॅरियर गाडी (एमएच.19-सीव्ही.6487) ही तल्लारे यांना विक्री केल्याची कागदपत्रे तयार करीत गाडी बळकावली. निलेश चौधरी यांनी घडल्या प्रकाराबाबत बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर लीना कृष्णा तल्लारे (रा.वरणगाव रोड, साक्री फाटा, भुसावळ), अजय गोडाले, शुभम पचेरवाल व अन्य तीन अनोळखी व्यक्तीविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अजय गोडालेला अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर लीना कृष्णा तल्लारे (वय 51, रा.वरणगाव रोड, साक्री फाटा, भुसावळ) यांच्यासह पाच संशयीतांनी बाजारपेठ पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती तर मुख्य आरोपी अजय गोडाले हा पसार होता. आरोपी पाडळसे येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शनिवारी रात्री साडेनऊ वाजता अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, पोलीस नाईक रमण सुरळकर, नाईक विकास सातदिवे, उमाकांत पाटील, ईश्‍वर भालेराव व रवींद्र बिर्‍हाडे आदींनी आरोपीला अटक केली.

Copy