भुसावळातील पवनपूत्र उद्यान उर्जितावस्थेच्या प्रतीक्षेत

0

भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक सहामधील पवनपूत्र उद्यानातील खेळण्यांसह बाकड्यांचे टारगटांनी कोरोना काळात नुकसान केल्याने या उद्यानाची रया गेली आहे. स्थानिक नगरसेवकांनी या उद्यानाचे रूप वर्षभरापूर्वीच पालटवले होते मात्र कोरोना काळात उद्याने बंदचे आदेश निघाल्यानंतर उपद्रवींनी उद्यानातील बाकड्यांचे नुकसान केले तर उद्यानात असलेल्या खेळण्यांसह कचराकुंड्यादेखील फोडल्याने उद्यानाचे वैभव हरवले आहे. सत्ताधारी व पालिका प्रशासनाने या उद्यानाला उर्जितावस्था देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

उद्यानात सर्वत्र वाढले गवत
शहरात पालिकेची उद्याने असलेतरी केवळ देखभाल व निगा राखली न गेल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. अलिकडे झालेल्या पालिकेच्या सभेत उद्यान-देखभाल दुरूस्तीचा विषय मंजूरही करण्यात आला मात्र तत्पूर्वी उद्यानांना पूर्ववत वैभव प्राप्त करणेदेखील तितकेच गरजेचे आहे. सुमारे वर्षभरापूर्वी प्रभाग सहामध्ये स्थानिक नगरसेवकांनी या उद्यानाचे रूप पालटल्यानंतर आबालवृद्धांची मोठी सोय झाली होती शिवाय आकर्षक खेळण्यांमुळे चिमुकल्यांनाही सायंकाळच्या वेळी मोठा दिलासा मिळाला होता. मार्च महिन्यात कोरोना आल्यानंतर उद्याने बंद होताच उद्यानाच्या दुरवस्थेला सुरूवात झाली. हल्ली सर्वत्र उद्यानात मोठ्या प्रमाणावर गवत पसरले असून अस्वच्छताही निर्माण झाली आहे.

टारगटांकडून साहित्याचे नुकसान
उद्यानातील साहित्याचे टारगटांकडून कोरोना काळात नुकसान करण्यात आले. चिमुकल्यांसाठी असलेला झोका तसेच अन्य खेळण्यांसह कचराकुंड्या फोडण्यात आल्या आहेत. आबालवृद्धांना बसण्यासाठी असलेल्या बाकांचेही काही प्रमाणात नुकसान करण्यात आल्याने पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे.

स्वखर्चाने दुरुस्ती करणार : प्रीतमा गिरीश महाजन
कोरोना काळात काही टारगटांनी या उद्यानाचे नुकसान केले तसेच बाकड्यांना देखील आग लावण्याचे प्रकार या उद्यानात घडले आहे. सध्या उद्यान बंद असल्याने लवकरच या उद्यानाची दुरवस्था थांबवून स्वखर्चातून दुरुस्ती करू, अशी माहिती या प्रभागाच्या नगरसेविका प्रीतमा गिरीश महाजन यांनी दिली.

पाठपुरावा करणार : प्रमोद नेमाडे
उद्यानांच्या देखभाल व दुरुस्ती संदर्भात पालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला आहे. उद्यानाची दुरवस्था थांबवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक प्रमोद नेमाडे म्हणाले.

Copy