भुसावळातील पतसंस्था ठेवीदारांना जिल्हा ग्राहक आयोगाचा दिलासा

भुसावळ : पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवल्यानंतर मुदत संपूनही ठेवींची रक्कम परत न करणार्‍या शहरातील पतसंस्था चालकांना जिल्हा ग्राहक आयोगाचा चांगलाच दणका दिला आहे. ठेवींची रक्कम परत करण्यासह मुदत संपल्यानंतरच्या कालावधीपासून व्याजासह मानसिक व शारीरीक त्रासपोटी दंडात्मक रक्कम व अर्जाचा खर्च देण्याचे आदेश जळगाव ग्राहक आयोगाने दिले आहेत.

या ठेवीदारांना मिळाला दिलासा
भुसावळातील संतोष माता मर्चंट को.ऑप क्रेडीट सोसायटीत अशोक शंकराव निकम, रवींद्र वसंत पाठक, शोभा अलय ललवाणी, शीला माखिजा, विश्वंभर वाणी ठेव ठेवूनही मुदतीत रक्कम मिळाली नाही. याबाबत दाखल खटल्यात 27 डिसेंबर 2021 रोजी ठेव रकमेवर नऊ टक्के व्याज, मानसिक व आर्थिक त्रासापोटी दहा हजार रुपये भरपाई व तक्रार अर्जापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिले.

अन्य पतसंस्थांनाही आदेशाने झटका
मंगला शारदा अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटीचे ठेवीदार अशोक शंकरराव निकम यांच्या प्रकरणातही ग्राहक आयोगाने 20 डिसेंबर 2021 रोजी निकाल देत ठेव रकमेवर देय दिनांकापासून नऊ टक्के व्याज, मानसिक, आर्थिक व शारीरीक त्रासापोटी पाच हजार तसेच तक्रारीचा खर्च तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले. भुसावळातील काळा हनुमान अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटीचे ठेवीदार सतीश गोलीवाल यांच्या तक्रारीबाबतही देय दिनांकापासून नऊ टक्के व्याज, मानसिक, आर्थिक व शारीरीक त्रासापोटी 10 हजार तसेच तक्रारीचा खर्च पाच हजार रुपये देण्याचे आदेश आयोगाने दिले. सर्व प्रकरणात ठेवीदारांतर्फे अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय (भुसावळ) यांनी प्रभावी बाजू मांडली.