भुसावळातील नवोदय कोविड सेंटरमधून 60 वर्षीय वयोवृद्धा बेपत्ता

0

भुसावळ (गणेश वाघ) : जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून भुसावळातील पॉझीटीव्ह अहवाल आलेली वयोवृद्धा सुरूवातीला बेपत्ता व काही दिवसानंतर रुग्णालयाच्या शौचालयात मयत आढळल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती व घटना ताजी असतानाच भुसावळातील नवोदय रुग्णालयातील कोविड सेंटरमधून 60 वर्षीय वयोवृद्धा बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघड झाल्याने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कोविड रुग्णालयाच्या भोंगळ कारभार समोर आला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी पुढे आली आहे. वयोवृद्धा बेपत्ता झाल्याच्या बाबीला वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी दुजोरा दिला असून पोलिसात या प्रकरणी वृद्धा बेपत्ता असल्याची नोंद करीत असल्याचे त्यांनीसांगून वृद्धा मनोरुग्ण असल्याचीही माहिती दिली आहे.

जळगावात हलवण्यापूर्वीच वृद्धा बेपत्ता
वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील साकरी फाटा परीसरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय वृद्धेला नवोदय कोविड सेंटरमध्ये रविवारी दाखल करून कॉरंटाईन करण्यात आले होते व सोमवारी स्वॅब घेवून ते तपासणीसाठी रवाना करण्यात आले होते मात्र वृद्धा मनोरुग्ण असल्याने दोन ते तीन वेळा तिने कॉरंटाईन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेसह कर्मचार्‍यांना केल्या होत्या. सदर वृद्धेला आम्ही सोमवारीच मानसोपचार तज्ज्ञाकडे हलवण्याची तयारी केली होती मात्र या वृद्धेचा मुलगाही रुग्णालयात दाखल असल्याने व त्याच्यावर उपचार सुरू असल्याने शिवाय या वृद्धेचा दुसरा मुलगाही होमगार्ड असल्याने त्यानेदेखील कर्तव्यावर असल्याची अडचण सांगितली होती व मंगळवारी आईला जळगाव हलवू, असे सांगितल्याने आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला होता. मंगळवारी सकाळी वृद्धेला जळगाव हलवले असावे, असे आम्हाला वाटले मात्र सायंकाळी वृद्धेच्या मुलाने आईबाबत विचारणा केल्यानंतर वृद्धा बेपत्ता असल्याची बाब पुढे आल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र वृद्धा न आढळल्याने आम्ही याबाबत पोलिसात नोंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य प्रशासनाचे वरातीमागून घोडे !
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10.30 वाजेनंतर वृद्धा बेपत्ता झाली (तत्पूर्वी वृद्धेने नास्तादेखील केला) व सायंकाळी साडेसहा वाजता वृद्धेच्या होमगार्ड असलेल्या मुलाने आईबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला मात्र या काळात कर्तव्यावर असलेली यंत्रणा करीत होती तरी काय? असा प्रश्‍न आहे. रुग्णालयात नियुक्त असलेले अधिकारी व नियुक्त स्टॉप, होमगार्ड आदींनी वृद्धा बाहेर पडत असताना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? की यंत्रणा झोपेत होती? असा प्रश्‍न आहे. मुळात कॉरंटाईन केलेल्या सेंटरमधून एखादा संशयीत रुग्ण बाहेर पडत असल्यास संबंधीत यंत्रणेने त्यास अटकाव करणे तितकेच गरजेचे आहे शिवाय अद्याप या वृद्धेचा अहवाल येणे बाकी असल्याने वृद्धा नेमकी कुणाच्या संपर्कात आल्यास त्यास जवाबदार कोण? असादेखील प्रश्‍न आहे. याहून गंभीर मुद्दा असा की, जर वयोवृद्धा मनोरुग्ण होती तर त्यांना दोन दिवस कोविड सेंटरमध्ये का ठेवण्यात आले, दाखल करतानाच का जळगाव हलवण्यात आले नाही? असा प्रश्‍न उपस्थित करण्यास वाव आहे. या बाबीला जवाबदार असलेल्या दोषींवर आता कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जळगावातील घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या
भुसावळच्या मालती नेहते (82) या वृद्धेची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आल्याने उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र 2 जून रोजी त्या रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने मालती नेहते यांचे नातू हर्षल नेहते यांना दिली होती त्यानंतर हर्षल नेहते यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर नेहते हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती तर मालती नेहते या वयोवृद्धेचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात सापडल्याची माहिती दिल्यानंतर रुग्णालयाच्या कारभाराबाबत टिकेची झोड त्यावेळी उठली होती व दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी पुढे आली होती.

जळगाव प्रकरणात आठ जणांचे झाले होते निलंबन
कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल भुसावळातील वृद्धेचा शौचालयात मृत्यू झाल्यानंतर महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आसीफ शेख यांना निलंबित करण्यात आले होते तर निलंबित होण्यापूर्वी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी तीन स्वच्छता कर्मचार्‍यांनाही निलंबीत केल्याने त्यावेळी या प्रकरणात एकूण आठ जणांचे निलंबन झाल्याची बाब पुढे आली होती.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार : आमदार संजय सावकारे
रात्री उशिराच घटना कळाली असून घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर निश्‍चित कारवाई होणे गरजेचे आहे व उद्याच (बुधवारी) आपण जिल्हाधिकारी, डीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

Copy