भुसावळातील दोघा तरुण भाविकांचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू

0

भुसावळ : शहरातील शनी मंदिर वॉर्डातील दोघा तरुणांचा श्री विसर्जनादरम्यान तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.51 वाजेच्या सुमारास घडली. उपेंद्र गुलाब चौधरी (19, शनी मंदिर वॉर्ड) व वैभव संजय शिंदे (19, शनी मंदिर वॉर्ड) अशी मयत तरुणांची नावे आहेत. दोघा तरुणांच्या मृत्यूने शनी मंदिर वॉर्डात शोककळा पसरली आहे. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर एकाचवेळी दोघा मित्रांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

चौघे बुडाले मात्र दोघांना वाचवण्यात यश
भुसावळातील शनिमंदिर वॉर्डातील ओम गणेश मंडळाचे सुमारे 15 भाविक मंगळवारी सायंकाळी श्री विसर्जनासाठी झेड.टी.सी. भागातील स्मशानभूमीसमोरील रेल्वे पुलाखाली गेले होते. याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे बुडाले. त्यातील धीरज संजय शिंदे (21) आणि किरण विश्वास मराठे (26) या दोघांना वाचविण्यात आले व लागलीच त्यांना भुसावळातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर वैभव संजय शिंदे (19) आणि उपेंद्र गुलाब चौधरी (19, दोन्ही रा.शनिमंदिर वार्ड) हे दोन जण बेपत्ता झाले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध न लागल्याने बुधवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता सुरूवातीला उपेंद्र चौधरीचा व नंतर वैभव शिंदेचा मृतदेह सापडला. घटनास्थळी भुसावळ कृउबाचे सभापती सचिन चौधरी तसेच तालुका पोलिसांनी धाव घेतली.

बारावीत प्रवेशाचे स्वप्न राहिले अपूर्ण
मयत उपेंद्र व वैभव हे दोघेही जीवलग मित्र हे श्री विसर्जनानंतर दुसर्‍या दिवशी बुधवारी शहरातील डी.एल.हिंदी विद्यालयात बारावीच्या वर्गात प्रवेश घेणार होते व त्याबाबत त्यांनी सोबतच्या मित्रांना तशी कल्पनादेखील दिली होती मात्र क्रुर काळाने अचानक त्यांच्यावर घाला घातला. चौघे मित्र पाण्यात बुडत असताना पोहणार्‍यांनी धीरज शिंदे यास वाचवले मात्र त्याचा भाऊ वैभव शिंदे पाण्यात बुडाल्याने मयत झाला. मयत वैभवच्या पश्‍चात आई, वडिल व भाऊ असा परीवार आहे. वैभवचे वडिल संजय शिंदे हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर मृत उपेंद्रच्या पश्‍चात आई, वडील व दोन बहिणी असा परीवार आहे. उपेंद्र हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा दुखःचा डोंगर कोसळला आहे. उपेंद्रचे वडिल सोपासेट बनवण्याचा व्यवसाय करतात. उपेंद्र हा भुसावळातील संतोष दाढी चौधरी यांच्या शालकाचा मुलगा होय.

एकाचवेळी निघाली अंत्ययात्रा
उपेंद्र व वैभव हे दोघा जीवलग मित्रांच्या मृतदेहाचे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात बुधवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सायंकाळी शनी मंदिर वॉर्डातील त्यांच्या घरापासून एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

Copy