Private Advt

भुसावळातील तरुणाचा वाढदिवशीच अपघाताने मृत्यू : आयशर चालकाला अटक

भुसावळातील अपघातामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात पसरली शोककळा : एकही घरात पेटल्या नाहीत चुली

भुसावळ : मद्यधूंद आयशर चालकाने तीन ठिकाणी अपघात केल्यानंतर नागरीक मारहाण करतील या भीतीने वाहन वेगात चालवून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र नियंत्रण सुटल्याने हे वाहन यावल रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील घरावर जावून आदळल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घरातील अन्य सदस्य बाहेर असल्याने मोठी प्राणहानी टळली. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात सम्राट उर्फ गोलू दादाराव इंगळे (21, भुसावळ) याचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. दरम्यान, गोलू या तरुणाचा शनिवारीच वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते मात्र क्रुर काळाने घडप घातल्याने संपूर्ण वस्तीत शोककळा पसरली व दिवसभर एकाही घरात चुली पेटल्या नाहीत. शनिवारी सायंकाळी मृत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकाच वेळी तीन ठिकाणी आयशरची धडक
जळगावकडून यावलकडे आयशर वाहन (एम.एच.46 ए.एफ.5554) घेवून चालक कलीम सलीम कुरेशी (सावदा, ता.रावेर) हा निघाला असताना साकेगावजवळ त्याने मद्यधूंद अवस्थेत सकाळी एका ईसमास धडक दिली तर त्यानंतर भरधाव वेगाने वाहन चालवून भुसावळात आल्यानंतर पुन्हा जळगाव रोडवरील धम्म नगराजवळ भानुदास चौधरी (66) यांना धडक मारली. या धडकेत चौधरी यांच्या हाता-तोंडाला जखम झाली व नागरीक मारहाण करतील या भीतीने पुन्हा भरधाव वेगाने आयशर वाहन पळवून यावलच्या दिशेने निघाला असतानाच यावल रस्त्यावरील साईजीवन समोरील पालिकेच्या पथदिव्यासही धडक दिली व त्यानंतर यावलकडे वाहन निघाले असतानाच एस.टी. ला साईड देण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने वाहन वनविभागाच्या नाक्यासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सम्राट इंगळे यांच्या घरावर जावून आदळले.

वाढदिवशीच क्रुर काळाने घातली झडप
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात मयत सम्राट इंगळे या तरुणाचे घर असून आई-वडील व दोन भावांसह तो वास्तव्यास होता. हातमजुरी करून तीनही भाऊ कुटूंबाला हातभार लावत होते. शनिवारी सकाळी भरधाव आयशर वाहन इंगळे यांच्या घराला जावून धडकल्याने स्नानगृहात अंघोळ करीत असलेल्या सम्राट या तरुणास जबर धडक बसली तर त्याचा लहान भाऊ निलेश (19) हा देखील जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत सम्राट यास खाजगी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, शनिवार, 9 रोजी सम्राटचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते व रात्री वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच किलो केकही बुक करण्यात आला मात्र अचानक क्रुर काळाने झडप घातल्याने वस्तीत शोककळा पसरली. दरम्यान, सुदैवाने घरातील अन्य सदस्य बाहेर असल्याने मोठी अप्रिय घटना टळली.

आयशर चालकाला चोप : पोलिसांची सतर्कता
यावल रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी वेळीच अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त जमावाने चालक कलीम सलीम कुरेशी (सावदा, ता.रावेर) यास काहीसा चोप दिला तर जमावाच्या तावडीतून वेळीच पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

दोषींवर कारवाईसाठी रहिवाशांचा रास्ता रोको
अपघातात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांसह रहिवाशांनी संतप्त होत दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संताप व्यक्त केला शिवाय अपघातग्रस्त वाहन अपघातस्थळावरून हलवू देण्यास नकार दिला, वाहन मालकाला जागेवर हजर करावे, अशी मागणी लावून धरली. पोलिस प्रशासनाने समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रभारी निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू यांनी संतप्त रहिवाशांच्या भावना ऐकून घेत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच समाजातील पदाधिकार्‍यांनी संतप्त रहिवाशांची समजूत काढली.

पदाधिकार्‍यांच्या सामंजस्यामुळे अप्रिय घटना टळली
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगरसेवक जगन सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाची बाजू ऐकून घेत त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. पदाधिकार्‍यांनी दाखवलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे वातावरण निवळले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष शरद सोनवणे, पप्पू सुरडकर, भीमज्योत शेजवळ, माजी नगरसेवक अमोल इंगळे, सुनील राखुंडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारी दुपारच्या सुमारास अपघातग्रस्त आयशर वाहन के्रनद्वारे पोलिस वसाहतीतील जुन्या उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले.

पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
अपघातानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे प्रभारी निरीक्षक राहुल गायकवाड, सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक अनिल मोरे, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्यासह शहर वाहतूक शाखेसह शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांसह व आरसीपी कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

शोकाकुल वातावरणात तरुणावर अंत्यसंस्कार
मयत सम्राट इंगळे या तरुणाच्या मृतदेहावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ असा परीवार आहे. दरम्यान, अपघात प्रकरणी निलेश दादाराव इंगळे यांच्या फिर्यादीनुसार आयशर चालक कलीम सलीम कुरेशी (सावदा, ता.रावेर) यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळातील ‘त्या’ कुटुंबाला घर बांधून देणार : रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात शनिवारी भरधाव आयशर घरावर धडकल्याने झालेल्या अपघातात सम्राट उर्फ गोलू दादाराव इंगळे (21, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेनंतर रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी धाव घेतली होती. संतप्त जमावाचे शांतपणे म्हणणे ऐकून घेत त्यांना न्याय देण्यासाठी कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे असल्याचे त्यांनी सांगून आश्वस्त केले होते शिवाय वाहनाच्या धडकेत इंगळे कुटुंबियांच्या घराची जी पडझड झाली त्या बदल्यात नव्याने घर उभारून देणार असल्याचे ठाम आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या समय सूचकतेसह दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.