भुसावळातील गोळीबार प्रकरण : नगरसेवक राजकुमार खरातसह सात आरोपींना कोठडी

0

भुसावळ : लॉण्ड्रीचा पत्ता विचारल्यानंतर पत्ता माहित नाही, असे उत्तर दिल्याच्या कारणावरून 19 वर्षीय तरुणावर रेल्वे रुग्णालयाजवळील ख्रिश्‍चन कब्रस्थानजवळ गुरुवारी रात्री गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नगरसेवक राजकुमार खरातसह अन्य पाच आरोपींना शुक्रवारी रात्री शहर पोलिसांनी अटक केली होती. अटकेतील आरोपींना शनिवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर अन्य सातव्या आरोपीलाही अटक करण्यात आली असून त्यासही न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गोपनीय माहितीवरून सहा आरोपींना अटक
आदित्य संजय लोखंडे (19, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) या तरुणावर आरपीडी रोडवरील कब्रस्थानजवळ सात संशयीत आरोपींनी गोळीबार करीत तसेच फायटरने मारहाण करीत जखमी केले होते शिवाय लोखंडे यांची दुचाकी तसेच मोबाईल घेवून पोबारा केला होता. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शहर पोलिसांच्या तीन पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री उशिरा संशयीत आरोपी सुरज सपकाळे (19), अमोल खिल्लारे (25), कल्पेश कासे (25), आतीश खरात (25), हंसराज खरात (19), राजकुमार खरात (27) या सहा आरोपींना अटक करण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी शुक्रवारी काही संशयीतांची पोलिस उपअधीक्षक कार्यालयात कसून चौकशीही केली होती. दरम्यान, रविवारी सातवा संशयीत असलेला राहुल धम्मपाल सुरवाडे (रा.लाल जैन मंदिराजवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली व न्यायालयाने त्यास गुरूवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपींना न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
आदित्य लोखंडे या तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी खरात भावंडांसह सहा आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना शनिवारी भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला कट्टा, नेमके हल्ल्याचे कारण आदी बाबींचा उलगडा होणार आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

Copy