भुसावळातील खून प्रकरण ; आरोपी जाळ्यात

भुसावळ : वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने मित्राची लोखंडी पावडा व धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना जामनेर रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिरासमोर शुक्रवार, 16 जुलै रोजी मध्यरात्री घडली होती. या घटनेत सचिन ज्ञानदेव भगत (32, श्रद्धा नगर, भुसावळ) या तरुणाचा खून झाला होता. खूनानंतर पसार झालेला आरोपी प्रदीप छगन आलवे (30, तितरायण्या, मध्यप्रदेश) यास पाल, ता.रावेर येथून मंगळवारी पहाटे अटक
करण्यात आली.

मित्रांनीच केला मित्राचा खून
सचिन भगत या तरुणाच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी केलेल्या पार्टीतच वाद ओढवल्याने संशयित आरोपी प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (29, पंढरीनाथ नगर, भुसावळ) याने अन्य मित्रासह सचिनचा डोक्यावर लोखंडी फावडा व धारदार शस्त्र मारून खून केला होता. शुक्रवार, 16 रोजी जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ ही घटना घडली होती. सुरूवातीला या गुन्ह्यात मुन्ना चौधरी यास अटक करण्यात आली होती. सचिन भगत या तरुणाच्या खून प्रकरणी मयताची पत्नी सपना सचिन भगत (26, श्रद्धा नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार मुन्ना चौधरी, राहुल कल्ले, जितू पावरा व अन्य इसमाविरोधात बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र बिर्‍हाडे, नाईक किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, विकास सातदिवे, श्रीकृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, जीवन कापडे, योगेश माळी, परेश बिर्‍हाडे आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक किशोर महाजन
करीत आहेत.

Copy