Private Advt

भुसावळातील खंडणी प्रकरणी दुसरा आरोपी जाळ्यात

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : अन्य पसार संशयीतांचा कसून शोध

भुसावळ : अश्‍लीप क्लीप महिलेला पाठवल्यानंतर त्या बदल्यात तडजोडीपोटी पाच लाख रुपये न दिल्याने व्यापार्‍यास मारहाण करीत बळजबरीने नोटरीद्वारे 18 लाख रुपये किंमतीची चारचाकी बळकावण्यात आल्याची घटना शहरातील वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीजवळ गुरुवार, 29 जुलै रोजी घडली. या प्रकरणी सात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दुसरा संशयीत आरोपी शुभम दिलीप पचेरवाल (21, रांकादेवी नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सात जणांविरोधात दाखल आहे गुन्हा
व्यापारी निलेश दिगंबर चौधरी (48, श्रीनगर, लोणारी हॉलजवळ, भुसावळ) यांनी या गुन्ह्याप्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवार, 29 रोजी सकाळी 11 ते 3 दरम्यान वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीजवळ संशयीत लीना तल्लारे व अजय गोडाले तसेच अन्य अनोळखींनी अश्‍लील क्लीपच्या तडजोडीपोटी पाच लाख रुपयांची मागणी केली मात्र रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी पचेरवालने फिर्यादीस मारहाण करीत जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली तसेच तल्लारे यांनी नोटरी करणार्‍या वकीलाला बोलावत जबरदस्तीने 18 लाख रुपये किंमतीची टाटा हॅरीयर गाडी (एम.एच.19 सी.व्ही.6487) ही तल्लारे यांना विक्री केल्याचे कागदपत्रे बनवत गाडी जबरदस्तीने घेवून गेले होते. या प्रकरणी लीना तल्लारेसह सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल आहे.

आतापर्यंत दोन आरोपींना अटक
तक्रारदार निलेश चौधरी यांना मारहाण करीत त्यांच्याकडील 18 लाखांची चारचाकी बळजबरीने हिसकावल्याप्रकरणी संशयीत आरोपी लीना कृष्णा तल्लारे (51, वरणगाव रोड, साक्री फाटा, भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून त्यांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, दुसरा संशयीत आरोपी शुभम पचेरवाल यास शनिवारी रात्री हॉटेल तनारीका परीसरातून बाजारपेठ पोलिसांच्या डीबी शाखेने अटक केली. संशयीताला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत सोनारे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव आदींच्या पथकाने केली.