भुसावळातील कोरोना संशयित डॉक्टरची प्रकृती चिंताजनक

0

जळगाव : जिल्हा रुग्णालयात आधीच पाच कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. यात गुरुवारी आणखी 4 संशयित रुग्ण कोरोना कक्षात दाखल झाले आहे. यात एक दाम्पत्य, एक नागरिक यांच्यासह भुसावळातील एम.डी. डॉक्टरचा समावेश आहे. या डॉक्टरची प्रकृती गंभीर असून, त्याला व्हेंटीलेटर लावण्यात आले आहे.

डॉक्टरसह चौघांच्या घशातील लाळेचे (स्वॅब) नमुने घेवून ते पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. गुरुवारचे चार व बुधवारी पाठवलेले पाच अश्या 9 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

डॉक्टर कोल्हापूरहून परतले अन् प्रकृती गंभीर

कोरोना विषाणू संसर्गाच्या संशयावरुन जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी चार संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील भुसावळ येथील एक डॉक्टर काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथून आले आहेत. तेव्हापासूनच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खबरदारीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले आहे.

इंडोनेशियातून परतलेले दाम्पत्यही दाखल

जळगावातील पती-पत्नी आठ दिवसांपूर्वी भुतान व इंडोनिशिया येथून सहल करून परतले. त्रास जाणवू लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जळगावातील एक तरुण दुबई येथून परतला आहे. त्रास जाणवल्याने तो देखील गुरुवारी रुग्णालयात दाखल झाला आहे. या चार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Copy