Private Advt

भुसावळातील कुविख्यात शेख भावंडांवर ‘एमपीडीए’

जळगाव जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या भुसावळातील कुविख्यात तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम (30, दीनदयाल नगर) व कलीम शेख सलीम शेख (32, दीनदयाल नगर) या भावंडावर जिल्हाधिकार्‍यांनी एमपीडीएची (स्थानबद्ध) कारवाई केल्याने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोघाही भावंडांविरोधात लूट, जबरी लूट तसेच मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, दोघा भावंडांना शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर मध्यरात्री त्यांची अँटीजन टेस्ट केल्यानंतर त्यांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.

शुक्रवारी दुपारीच आरोपी ताब्यात
दोघा संशयांताविरुद्ध एमपीडीएची कारवाई होण्यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना निर्देश दिले होते. उभयंतांचा प्रस्ताव तयार करण्यात आल्यानंतर तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला होता. शुक्रवारी रात्री उशिराने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी एमपीडीएच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. दोघांविरुद्ध एक वर्षांसाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून शुक्रवारी दुपारीच संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर रात्री उशिरा त्यांची मेडिकल व अँटीजन टेस्ट केल्यानंतर त्यांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.

गुन्हेगारांची होणार हद्दपारी : पोलीस उपअधीक्षक
भुसावळात शांतता निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आणखी काही गुन्हेगारांवर मोक्का व एमपीडीएची कारवाई प्रस्तावीत आहेत तर हद्दपारीचे 51 प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. काहींची आपल्याकडे चौकशी सुरू असून काही अंतीम प्रस्ताव कारवाईसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक व प्रांताधिकार्‍यांकडे पाठवण्यात आले आहेत. लवकरच त्यावर निर्णय होवून सामाजिक शांततेला धोका निर्माण करणारे विघ्नसंतोषी शहराबाहेर जातील, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.