भुसावळातील उडीद उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी सेनेचे प्रशासनाला निवेदन

0

हमी भावापेक्षाही अल्प दरात खरेदीने शेतकरी हवालदील : बाजार समित्यांकडून पिळवणूक

भुसावळ- केंद्र शासनाने उडीदाला पाच हजार 600 रुपये भाव तसेच इतर धान्यालादेखील हमी भाव जाहीर केला होत मात्र हमी भावापेक्षाही कमी भावात धान्याची विक्री होत असून शहराच्या बाजारपेठेत सरासरी 3800 ते 4000 रुपये दराने चांगल्या प्रकारच्या उडीदाची विक्री होत असून एफएक्यू दर्जाचा माल नाही अशी कारणे व्यापारी देत असल्याची तक्रारी शहर शिवसेनेकडे शहरातील शेतकर्‍यांनी केल्या होत्या. त्या अनुषंघाने प्रशासनाने दखल घेवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

जादा आणेवारी लावून प्रशासनाने केली थट्टा
भुसावळ परीसरात समाधानकारक पाऊस पडला नाही, असे हवामान खात्यानेसुद्धा जाहीर केलेले आहे. भुसावळ परिसरात आधीच दुष्काळजन्य परीस्थिती असल्याने कडधान्याचे उत्पन्न घटले आहे त्यात तहसील प्रशासनाने आणेवारी 61 पैसे करून सर्व सामान्य शेतकर्‍याची थट्टा उडवली आहे. तसेच दुष्काळ लवकर जाहीर करावा, अशी मागणी तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे. आता हमीभाव न मिळाल्याने शहरातील शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. बाजार समितीकडून शेतकर्‍याची पिळवणूक होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केल्यास खरेदी करणार्‍या व्यापार्‍यास एक वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून याबाबतच्या पणन कायद्यास मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाने केलेला हा कायदा शेतकर्‍यांना हमीभाव मिळावा या हेतूने केला आहे याचा प्रशासनाला विसर पडलेला नसावा, अशी आठवण याप्रसंगी करून देण्यात आली.

हमी भाव न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
योग्य हमी भाव न शेतकर्‍यांना न मिळाल्यास शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उपजिल्हा संघटक विलास मूळे यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा दक्षिण विभाग शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी दिला आहे. शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. संबंधित प्रशासनाशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन डॉ. चिंचकर यांनी दिले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरळकर,उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे (दक्षिण विभाग), शहरप्रमुख निलेश महाजन (उत्तर विभाग) शहर संघटक योगेश बागुल, शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर, ग्राहक संरक्षक कक्ष शहर प्रमुख मनोज पवार, अल्पसंख्याक शहर प्रमुख शेख मेहमूद, व्यापारी सेनेचे अब्रार ठाकरे, शिक्षकसेनेचे उपजिल्हा प्रमुख पठाण, आमिर खान, अन्सार शहा, फिरोज तडवी, सोनी ठाकूर, विक्की चव्हाण, पंकज पाटील तसेच शिवसेना कार्यकर्ते व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी उपस्थित होते.