भुसावळातील ‘ईसीसी’ सोसायटीत कर्ज वाटपात भेदभाव

भुसावळातील सीआरएमएस संघटनेचा पत्रकार परीषदेत केला धक्कादायक आरोप !

भुसावळ : रेल्वेच्या ईसीसी सोसायटीत संबंधितानी सर्व नियम धाब्यावर बसवून कामे सुरू केली असून कर्ज वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप सीआरएमएसतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत करण्यात आला. भुसावळातील रेल्वे स्थानक मार्गावरील सीआरएमएस कार्यालयात मंगळवारी सायंकाळी पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पदाधिकार्‍यांनी रेल्वेच्या ईसीसी सोसायटीत कर्ज देतांना सर्व नियम धाब्यावर बसवून कर्ज प्रकरणे केली जात असल्याचा दावा करीत जवळचा सदस्य असल्यास एक दिवसात तर एनआरएमयुचा सदस्य नसल्यास त्यांना 15 दिवस लावले जात असल्याचेही पदाधिकारी म्हणाले.

निवेदन स्वीकारण्यासही मिळतो नकार
मंडळ समन्वयक एस.के. दुबे यांनी प्रास्तावीक केले. यावेळी मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवेदन कोणीही देऊ शकते, मात्र ईसीसी सोसायटीत तेथील महिला प्रबंधक यांनी निवेदन स्विकारण्यास चक्क नकार दिला. पूर्वी सोसायटीत दोन ते तीन दिवसात कर्ज मंजूर केले जात होते. आता तेथे भेदभाव केला जात असतो. ईसीसी सोसायटीत सर्वच नियम धाब्यावर बसविले जात असून तोंड पाहून तेथे कर्ज मंजूर केले जाते. कोरोनाच्या काळात सदस्यांना कर्ज पाहिजे होते त्यावेळी सोसायटी बंद होती, ती आम्ही सीआरएमएसने सुरू करायला लावली. गरजू कर्मचार्‍यांच्या कर्जाचा प्रश्न सोडविला. एनआरएमयुला रेल्वे कर्मचार्‍यांच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही, त्यांना फक्त सोसायटीच हवी आहे. त्या संचालकांना अहंकार आला आहे. सोसायटीत मूलभूत सिध्दांताचे उल्लंघण केले जात आहे, असा आरोप समाधिया यांनी केला. सोसायटीमधून कसे लोन दिले जाते याची आम्हाला चांगली माहिती आहे, असा टोलाही समाधीया यांनी लगावला.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी मंडळ सचिव एस.बी.पाटील, मंडळ संगठक बी.के. रायकवार, ईसीसी सोसायटी डेलिगेट किशोर कोलते. ए.एस.राजपूत, अजित अमोदकर, विकास सोनवणे, ईश्वर बाविस्कर, विशाल खरे, हरिशचंद्र सरोदे, व्ही.एल. आठवले, सचीन खाडवे, राकेश सोनी, चंद्रकांत चौधणी, तुषार येवले, दीपक खराटे आदी उपस्थित होते.

Copy