भुसावळसह साकेगावातील 30 जुगार्‍यांना पोलिसांकडून अटक

पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त : आखाजीच्या सणाला पत्त्यांचा डाव रंगवणार्‍या जुगार्‍यांच्या आनंदावर कारवाईने विरजण

भुसावळ : आखाजी अन् पत्त्याचा डाव हे अलिखीत समीकरण असलेतरी यंदा मात्र पोलिसांनी जुगार्‍यांच्या आनंदावर विरजण पाडत बाजारपेठ व तालुका हद्दीत धडक कारवाई करीत तब्बल 30 जुगार्‍यांची वरात पोलिस ठाण्यात आणली. भुसावळात विविध दोन ठिकाणी तर साकेगावात धाड टाकत तब्बल एक लाख 80 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांना पाहताच अनेकांनी मात्र धूम ठोकली.

पहिल्या कारवाईत सहा जुगारी जाळयत
भुसावळ :
जामनेर रोडवरील साईबाबा मंदीरामागे रंगात आलेल्या जुगाराच्या डावावर पोलिसांनी शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास धाड टाकली. देवचंद रतनपुरी गोसावी (महेश नगर, भुसावळ), अमोल काशिनाथ राणा (श्रीराम नगर, भुसावळ), गजानन एकनाथ पाटील (महेशनगर), प्रशांत उर्फ बबलू नाना नरवाडष (रा.कला नगर), निखील श्रीकृष्ण पाटील (रा. कला नगर), श्रीकृष्ण वासदेव सपकाळ (रा.दिनदयाल नगर) यांना अटक करण्यात आली तर संशयीतांकडून 15 हजार 560 रूपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, उमाकांत पाटील, दीपक पाटील, लिलाधार कपले आणि ईश्वर भालेराव यांनी ही कारवाई केली. सहा.पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी पंचनामा केला.

साकेगावात नऊ जुगारी जाळ्यात
भुसावळ :
आखाजीनिमित्त तालुक्यातील साकेगाव येथील टॉवरजवळ पडीक असलेल्या मोकळ्या जागेवर पत्त्याचा डाव सुरू असतानाच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास छापा टाकून अजय सुधाकर चौधरी, विलास पवार, संतोष लोणे, प्रकाश लोहार, सोपान फालक, प्रकाश कोलते, सागर कोळी पुंडलीक पाटील (धनगर) या नऊ जणांना पकडण्यात आले. 40 हजारांच्या रोकडसह 11 हजार 210 हजार रुपयांचे मोबाईल मिळून 51 हजार 210 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा.वोलिस निरीक्षक अमोल पवार, सहायक फौजदार दशरथ राणे, विजय पोहेेकर, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, विनोद वितकर, अविनाश पाटील आदींनी ही कारवाई केली.

भुसावळात 13 जुगारी जाळ्यात
भुसावळ :
शहरातील विवेकानंद नगरात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकीत सागर तायडे, उमेश वाढे, तुषार डोळे, योगेश पाटील, शरद तराड, अमोल खंडारे, कीरण पाटील, नितीन पाटील, सागर काटकर, नितीन महाजन, मुकेश महाजन, मंगेश भंगाळे, उमेद्र वाघचौरे यांना अटक केली. जुगार्‍यांकडून पोलिसांनी 12 हजार रूपये रोख आणि मोबाईल असा सुमारे 1 लाख 13 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, रविद्र बिर्‍हाडे, परेश बिर्‍हाडे, प्रशांत परदेशी आदींनी ही कारवाई केली.