भुसावळच्या विकासाचे खरे शिल्पकार तत्कालीन मुख्याधिकारी एच.बी.भोंगळेच

0

भुसावळ : भुसावळच्या विकासाचे खरे शिल्पकार संतोष चौधरी नव्हे तर तत्कालीन मुख्याधिकारी एच.बी.भोंगळे असून त्यांच्या काळातच शहराचा विकास झाल्याचा दावा भाजपा पदाधिकार्‍यांनी बुधवारी पत्रकार परीषदेत केला. आमदारांनी एकेरी भाषा वापरल्यानंतर त्यांच्यावर टिकेची तोफ डागणार्‍यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे व यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांनी आमदारांविरुद्ध एकेरी व शिवराळ भाषा वापरल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगून राजकीय हवेदावे सोडून आता शहराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्लाही भाजपा पदाधिकार्‍यांनी दिला. सत्ताधारी-विरोधकांमध्ये हतनूरचे राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र पळवल्यावरून गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू असून या पार्श्‍वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने शहरवासीयांचे चांगलेच मनोरंजन होत आहे शिवाय निवडणुकीपूर्वीच शहरात आखाडा तापला आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांच्या फैरीनंतर भाजपा पदाधिकार्‍यांनी लोणारी समाज मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी पत्रकार परीषदेत घेवून विरोधकांवर टिकेची तोफ डागली.

माजी नगराध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावे : प्रा.सुनील नेवे
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी आत्म परीक्षण करणे गरजेचे असल्याचे भाजपचे जिल्हा संगटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी सांगत आमदारांना अकार्यक्षम ठरवण्यापूर्वी या केंद्रासाठी आमदार सावकारे यांनी विधानसभेत विषय मांडल्याचे त्यांनी सांगितले. 2004-09 मध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असतांना व संतोष चौधरी हे आमदार असतांना तत्कालीन गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी त्यावेळी मंजूर असलेले पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रकल्प पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथे पळवून नेले होते व त्यावेळी संतोष चौधरी यांनी प्रकल्प रोखण्यासाठी कुठलाही पत्रव्यवहार किंवा आंदोलन केले नसल्याची आठवण नेवे यांनी सांगितले. कार्यक्षम कोण अकार्यक्षम कोण हे यावरून सिध्द होते, असेही त्यांनी सांगत 2009-14 दरम्यान त्यावेळी विरोधी पक्ष नेते राहिलेल्या एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत एकत्र येऊन सरकारला जाब विचारला होता. भाजप-सेना युतीची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या केंद्रासाठी 81 व 56 असा 137 कोटी रू.निधी मंजूर केला होता. जीव ओतून प्रकल्पासाठी काम करूनही या सरकारने ते प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात हलवले. अशावेळी तर पक्ष बाजुला ठेवून राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा किंवा आपण स्व:त तरी प्रयत्न करावे, असे सांगत एमआयडीसीमध्ये रस्ते, वीज, पाणीप्रश्‍न आदी समस्या सोडवल्याने उद्योग आमदार सावकारेंमुळे आले, असेही ते म्हणाले.

निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राजकारण : नगराध्यक्ष रमण भोळे
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, आमदार संजय सावकारे व नगरपरीषदेने अनेक विकासकामे केली हे सर्व जनतेसमोर आहे. आमदार सावकारेंमुळे बरेच उद्योग आले व अनेक तरुणांना रोजगार मिळाला. आमदार सावकारेंची बदनामी करण्याचा प्रयत्न सद्ध्या सुरू असून कोरोना आढावा बैठक, जिल्हाधिकारी बैठक, केंद्रीय आरोग्य पथकाशी चर्चा, स्थानिक प्रशासन व पोलिसांसोबत समन्वय ठेऊन कायम आमदार सावकारे व मी सोबत राहिले. नगरपरीषद रुग्णालय व ग्रामीणमध्ये सुमारे 50 लाखांचे साहित्य आमदार सावकारे यांनी उपलब्ध करून दिले असून नगरपरीषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर हे सर्व सुरू असल्याचा दावाही भोळे यांनी केला.

खंडणीखोर कोण? हे जनतेला ठावूक : युवराज लोणारी
माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, विरोधकांनी आधी स्वत:चे कर्तृत्व बघावे व नंतर या निष्क्रिय लोकांनी आरोप करावे. नगरपरीषदेच्या माध्यमातून नोकर भरती करून बेरोजगार तरुणांकडून कुणी किती अफाट पैसा हडप केला? हे जगजाहीर आहे. नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या साईजीवन सुपर शॉपीमुळे भुसावळ शहरात कोरोना रूग्ण वाढत असल्याचा आरोप काही विरोधक करीत आहे मात्र कोठारी यांनी कठीण काळात हजारो गरीब व गरजुंची सेवा केली असून भुसावळ शहराचे खरे शिल्पकार हे संतोष चौधरी नव्हे तत्कालीन मुख्याधिकारी एच.बी.भोंगळे होते, असा दावाही त्यांनी करीत काही अघोरी नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना हतनूरमधील राज्य राखीव केंद्र अन्य जिल्ह्यात गेल्याचा आनंद होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

ही वेळ वादाची नव्हे एकत्र येवून विकासाची : मुन्ना तेली
भाजपा गटनेते हाजी मुन्ना तेली म्हणाले की, कुणावरही टिका न करता आमदार सावकारे यांनी शहरातील विविध भागात अनेक कामे केली. कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असून ही वेळ वाद करायची नाही. सध्या मतभेद विसरून सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन काम करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजप शहराध्यक्ष दिनेश नेमाडे यांनी आमदार सावकारे यांनी केलेल्या प्रशासकीय कार्यालय, तहसीलदार कार्यालय, ट्रामा सेंटर आदी मोठ्या कामांची आठवण करून दिली.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, हाजी शफी पहेलवान, वसंत पाटील, प्रमोद नेमाडे, पुरूषोत्तम नारखेडे, पिंटू कोठारी, मुकेश पाटील, अजय नागराणी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, देवा वाणी, सतीश सपकाळे, परीक्षीत बर्‍हाटे, राजेंद्र आवटे, किरण कोलते, परीक्षीत बर्‍हाटे, गिरीश महाजन, पवन बुंदेले, अमोल महाजन, दिनेश नेमाडे, प्रमोद कोळंबे, किशोर कोलते, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, भाजपा पदाधिकार्‍यांनी केलेल्या दाव्यांसंदर्भात भूमिका जाणून घेण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरींशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

Copy