भुसावळच्या भाजपा बैठकीत खडसे समर्थकांची पाठ

0

भुसावळ (गणेश वाघ) : गेल्या 40 वर्षांपासून भाजपा पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र झटणारे पक्षनिष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षाकडून होणार्‍या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाला रामराम केल्यानंतर जिल्ह्यातील भाजपात भगदाड पडणार, असे चित्र निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर भुसावळसह विभागात गुरुवारी भाजपा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत डॅमेज कंट्रोज बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. भुसावळातील लोणारी समाज मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठ असलेल्या खडसेंना पुन्हा पक्षात आणून त्यांना त्यांचा सन्मान परत द्यावा, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला तर पक्ष ही विचारधारा असून तो कुणासाठी थांबत नसतो, शिवाय कुणाच्या येण्याने वा जाण्याने तो थांबत नसतो, असे विधान करीत जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये बळ संचारण्याचे प्रयत्न केले. मात्र खडसेंवर झालेल्या अन्यायानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना न्याय द्यावा यासाठी काही समर्थकांनी खडसेंच्या नावाचा जयघोष करीत खळबळ उडवून दिली.

खडसे समर्थकांनी फिरवली पाठ
भुसावळात भाजपाची बैठक असलीतरी त्यावर खडसेंची छाप असल्याचे दिसून आले. खडसेंना मानणारे समर्थक त्यात दिसून आले नाही. नगराध्यक्ष रमण भोळे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, भाजपा गटनेते मुन्ना तेली, संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, पुरूषोत्तम नेमाडे, वसंत पाटील, किरण कोलते, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, गिरीश महाजन आदींसह अन्य अनेक जण या बैठकीला अनुपस्थित राहिले. अनुपस्थित असणार्‍यांची कारणे बहुविध असलीतरी त्यात खडसेंविषयी अर्थातच प्रेम जास्त असल्याचे दिसून आलेे तर एका जवाबदार पदाधिकार्‍याने खडसे समर्थकांना बैठकीसाठी आमंत्रण दिले नसल्याचाही दावा केला तर एका पदाधिकार्‍याच्या माहितीनुसार, या बैठकीला काही भाजपेयींनी येवू नये यासाठी त्यांना आग्रहही धरण्यात आला अर्थात त्यांना फोन करण्यात आला असल्याचा दावा केला त्यामुळे भाजपात पडलेली उभी फूट आगामी राजकारणाचे नवीन संकेत तर नाही ना? असा प्रश्‍न विचारण्यास नक्कीच वाव आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री गिरीश महाजन हे आजच्या भुसावळातील बैठकीला उपस्थित नव्हते शिवाय ते फडणवीस यांच्यासाठी मुंबईत असल्याची माहितीही निकटवर्तीयांनी दिली.

जिल्हाध्यक्षांची अप्रत्यक्ष खडसेंवर टिका
जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत भाजपा कार्यकर्त्यांचे कान फुंकले. काय मिळाले, काय गेले त्याचा विचार करू नये, भाजपा हा विचारांवर चालणारा पक्ष आहे, असे सांगत ते म्हणाले की, उद्या मी पक्षात नसेल तरी पक्ष थांबणार नाही, असा सूचक संकेत देत ते म्हणाले की, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांचा इतिहास सांगत त्यांनी केवळ भाजपा हा लोकशाही पक्ष असल्याचे सांगितले. अर्जुन व कर्णाच्या दातृत्वाची कथाही त्यांनी सांगत खासदार आपल्यासोबत असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना आश्‍वस्त केले.

कोरोना योद्ध्यांचा सत्कार
याप्रसंगी कोरोनाच्या कटू काळात जनसेवेसाठी अहोरात्री झटणार्‍या नगरसेवक पिंटू कोठारी व नगरसेवक युवराज लोणारी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आल. याप्रसंगी काहींनी भाजपात प्रवेश केला.

कार्यकर्त्यांनी केला खडसेंचा गजर
मान्यवरांच्या भाषणानंतर बिल्डर चंद्रशेखर अत्तरदे यांनी माजी मंत्री खडसेंचा नामोल्लेख करीत ते म्हणाले की, ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे खडसे हे उभे राहत होते अगदी त्याचप्रमाणे पक्षाने पाठीमागे राहण्याची अपेक्षा केली तर एका कार्यकर्त्याने निष्ठावंत आता भाजपात नसल्याने भाजपाची कार्यकारीणी बरखास्तीची मागणी केली. शेतकी संघ संचालक प्रशांत निकम यांनी 40 वर्ष भाजपा पक्ष वाढीसाठी झटणार्‍या खडसेंचा साधा नामोल्लेख न झाल्याने संताप व्यक्त करीत भटजी-शेटजींचा पक्ष वाढवणार्‍या खडसेंना पक्षाने आता मानाचे स्थान देवून त्यांचे पक्षात पुन्हा पुर्नवसन करण्याची मागणी करीत कटप्पाने बाहुबली को क्यो मारा? असा प्रश्‍न उपस्थित करीत सर्वांनाच अंर्तमुख केले.

जिल्हाध्यक्ष म्हणाले, खडसेंसोबत असलेल्यांनी किमान राजीनामा द्यावा
खडसेंच्या पक्ष प्रवेशावेळी भुसावळातून अनेक भाजपाप्रेमी तथा खडसे समर्थक मुंबईत ठाण मांडून होते शिवाय त्यांचे सोशल मिडीयावर चित्रही व्हायरल झाले होते त्यामुळे तेच लोक आज भाजपाच्या बैठकीलाही अनुपस्थित राहिले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाध्यक्षांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, ज्यांना खरोखर आता भाजपात रहावयाचे नाही. त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे कारण हा पक्ष विचारधारेवर चालणारा आहे. जे आजच्या बैठकीला आले नाहीत, त्यांना खुलासा विचारण्यात नक्कीच येईल, ज्यांना भाजपात यावयाचे नाहीत त्यांनी खुशाल नाजीनामे द्यावेत, असेही ते म्हणाले.

नाथाभाऊंवर अन्याय झाला का?
40 वर्ष पक्ष वाढवण्यासाठी खडसेंनी खस्ता खाल्या, अशा नेत्यांवर अन्याय झाला का? या प्रश्‍नावर जिल्हाध्यक्षांनी गोलमाल उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांच्याबाबत जे घडले अर्थात ते आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडले मात्र खडसेंवर अन्याय झाला याबाबत बोलताना ते काहीसे कचरल्याचे दिसून आले. भाऊ गेले हे दुर्दैव असल्याचे सांगून ते म्हणाले की, साधा कार्यकर्ता गेला तरी दुःख होते मात्र खडसे हे आमचे नेते होते, त्यांच्याविषयी अधिक बोलणे मी योग्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. खडसे गेल्यानंतर डॅमेज कंट्रोल कसे करणार ? या प्रश्‍नावर ते म्हणाले की, भाजपा हा सेवेसाठी काम करणारा पक्ष आहे, आम्ही कामच करत राहणार असल्याचे मोघम उत्तर त्यांनी देत अधिक बोलणे टाळले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
भाजपाच्या या बैठकीला खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, राजेंद्र फडके, संघटनमंत्री किशोर काळकर, विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी सभापती राजेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.