भुसावळकरांची वाढली चिंता : सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

भुसावळ : गुरुवार पाठोपाठ शहरात सलग दुसर्‍या दिवशी शुक्रवारी देखील कोरोनाचा नवीन रुग्ण आढळल्याने शहर व ग्रामीण भागातील नागरीकांची चिंता वाढली असतानाच शनिवारी आलेल्या अहवालात पुन्हा भुसावळ शहर व तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने नागरीकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीच्या आठवड्यात शहर आणि ग्रामीण भागात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नव्हता मात्र आता सलग तीन दिवसांपासून रूग्ण आढळत आहे. त्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या चार झाली आहे.

विदेशवारी केलेल्या सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह
शहरातील सहा जणांनी अलीकडेच विदेशवारी केल्यानंतर भुसावळ गाठले. उभयंतांची अ‍ॅन्टीजन व आटीपीसीआर चाचणी करण्यात आली मात्र ती निगेटीव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. खबरदारी म्हणून संबंधिताना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी आलेल्या अहवालातील दोघे रुग्ण भुसावळ ग्रामीणमधील रुग्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नागरीकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हात वारंवार साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विभागातील यावल, रावेर, मुक्ताइनगर, बोदवड येथे मात्र एकही रुग्ण आढळला नाही. या चारही तालुक्यातील सक्रिय रुग्ण संख्या शून्य आहे.

जळगाव जिल्ह्यात 2577 रुग्णांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 801 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 213 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 577 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, जळगाव शहरातील सात तर भुसावळातील चार रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.