भुजबळांकडून अजित पवारांचे समर्थन; निवडणुका असल्याने हा प्रकार सुचतो आहे

0

मुंबई-सिंचन घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा एसीबीने काल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर केला. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी माजी उपमुख्यमंत्री तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांचे समर्थन केले आहे. आगामी काळात निवडणुका असून निवडणुकीच्या तोंडावर हा नाहक त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भुजबळांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

सिंचन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टात दाखल दोन जनहित याचिकांच्या सुनावणीत एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी अजित पवारांची पाठराखण केली. बुधवारी छगन भुजबळ हे पुण्यात असून त्यांनी महात्मा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अजित पवारांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर हा त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रात सादर करण्यात आले. हा त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

एसईबीसी आणि ओबीसी हे एकच आहेत. घटनेत ओबीसी हा शब्द नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बाकीच्या वर्गाचे आरक्षण कायम ठेवूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे त्यांनी सांगितले. तीन ते चार माजी महाधिवक्ते आणि काही ख्यातनाम वकिलांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात टीकेल अशा पद्धतीने आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे.