भिवंडी कारखान्याला आग, चार कामगार दगावले

0

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हरियांत कंपाऊंडमधील देडिया पॉलस्टिक कंपनीला शॉटसर्किटमुळे रविवारी भीषण आग लागली. या आगीत तीन महिलांसह एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

सारिका अनंता घासरे (25), निर्मला मधुकर जादूगार (35), अनुराधा ज्ञानेश्‍वर निबोले (30) मनोज (20) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. देडिया पॉलस्टिक कंपनीतील मोती कारखान्यात सुमारे 30 ते 35 कामगार काम करीत होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किटने आग लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करून चौही बाजूने आग वेढली गेल्याने या आगीत तीन महिलांचा व एक पुरुषाचा मृत्यू झाला. तर दोन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग विझवण्यासाठी भिवंडी, ठाणे, भाईंदर, कल्याण अशा ठिकाणाहून अग्निशमन दलांच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले.